
प्रत्येकालाच आयुष्यात आपल्या स्वत:चा व्यवसाय असावा असे वाटते. रोजची नोकरी सोडून आपलं स्वत:चं असं काहीतरी उभारावं यासाठी अनेकजण धडपडतात. यात काहीजण यशस्वी होतात तर काही लोकांना यात अपयश येतं.

सध्या आपली नोकरी सोडून स्वप्न पूर्ण करणाऱ्या अशाच एका कपलची चर्चा होत आहे. हे कपल आता उभारलेल्या व्यवसायातून महिन्याला तब्बल एक कोटी रुपये कमवतं. पाठीशी कोणताही अनुभव नसताना या कपलने मोठा व्यवसाय उभारला आहे.

या कपलचे नाव पूजा नाडिग आणि शशांक सिवापुरापू असे आहे. हे कपल बंगळुरू येथे राहते. त्यांनी Nerige Story नावाने आपला साडी विकण्याचा व्यवसाय उभारला आहे. विशेष म्हणजे हे कपल काही साधारण साड्या विकत नाही. साड्यांच्या माध्यमातून जुनी संस्कृती जपली जाईल, हा नियम ते कटाक्षाने पाळतात.

पूजा या अगोदर सॉफ्टवेअर टेस्टिंगचे काम करायच्या. तर शशांक यांचे एमबीएचे शिक्षण झालेले असून ते सेल्सध्ये नोकरी करायचे. परंतु त्यांनी पारंपरिक स्टाईल असणाऱ्या साड्या विकण्याचे ठरवले आणि Nerige Story नावाचा ब्रँड सुरू केला.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही अनुभव नव्हता. विशेष म्हणजे फारसे भांडवलदेखील नव्हते. त्यांनी या व्यवसायात अगोदर तीन लाख रुपये लावले. आज ते महिन्याला एक कोटी रुपयांची उलाढाल करतात.

Nerige Story नावाच्या त्यांच्या कंपनीतर्फे आज कॉटन, सिल्क, जरी असलेल्या साड्या मिळतात. या साड्यांची किंमत ही 2000 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत आहे. त्यांच्या या सक्सेस स्टोरीची देशभरात चर्चा होत आहे.