Taarak Mehta: ‘तारक मेहता’मधल्या मेहता साहेबांचं आलिशान घर; पर्सनल लायब्ररी अन् बाल्कनीतून दिसतं सुंदर दृश्य
एकूणच, शैलेश लोढा यांचं ‘अजारी’ हे घर केवळ आलिशान नाही, तर त्यांच्या साहित्यिक, कलात्मक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची झलक देणारं आहे. आधुनिक सजावटीसोबत पुस्तकं, कला, अध्यात्म आणि निसर्ग यांचा केलेला सुंदर समतोल हे या घराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतील मेहता साहेब म्हणजेच अभिनेता आणि कवी शैलेश लोढा यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. मालिकेत साध्या आणि समजूतदार स्वभावाच्या मेहता साहेबांची भूमिका साकारणारे शैलेश लोढा प्रत्यक्ष आयुष्यात मात्र आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. आता त्यांच्या मुंबईतील आलिशान घराची झलक समोर आली असून, घरातील इंटेरिअर पाहून चाहतेही प्रभावित झाले आहेत. फराह खानच्या होम टूरमधून शैलेश यांच्या ‘अजारी’ या घराची खास झलक पाहायला मिळाली.
शैलेश लोढा यांच्या घराचं नाव ‘अजारी’ आहे. घराच्या प्रवेशद्वारावर लाकडी नेमप्लेटवर हे नाव लिहिलेलं दिसतं. या नावाचा जपानी भाषेतील अर्थ ‘शिकवणारा’ असा असल्याचं सांगितलं जातं. नेमप्लेटच्या वर छोटी वीणा आणि भिंतीवर आकर्षक हत्तीच्या आकाराचं मेटल आर्ट दिसतं. या सजावटीतून घरात पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.
घराचा लिव्हिंग एरिया प्रशस्त आणि नैसर्गिक प्रकाशाने उजळलेला आहे. पांढऱ्या रंगाचा मोठा सोफा या खोलीचा केंद्रबिंदू आहे. त्यासोबत निळ्या रंगाच्या खुर्च्या आणि पिवळ्या रंगाची आरामदायी आर्मचेअर ठेवण्यात आली आहे. भिंतीवरील हिरव्या- पिवळ्या रंगाची अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आणि मोठ्या काचेच्या स्लायडिंग विंडोमुळे संपूर्ण जागेला आधुनिक आणि प्रसन्न लूक मिळतो.
शैलेश लोढा यांच्या घरात अध्यात्म आणि कलेला विशेष स्थान असल्याचं या होम टूरमधून दिसतं. बाल्कनीच्या काचेच्या दरवाजाजवळ देवी सरस्वतीची मोठी आणि सुंदर मूर्ती ठेवण्यात आली आहे. त्याच परिसरात गणपतीची छोटी मूर्तीही दिसते. त्यामुळे घरातील हा कोपरा केवळ सजावटीचा भाग न राहता शांत आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारा ठरतो.
घरातील डायनिंग एरियालाही खास लूक देण्यात आला आहे. काळ्या रंगाच्या लेदर खुर्च्या, क्लासिक डायनिंग टेबल आणि आकर्षक डेकोरेटिव्ह पीस यामुळे या भागाला रॉयल टच मिळतो. भिंतीवरील कलाकृती, शोपीस आणि वॉर्म लाइटिंगमुळे डायनिंग स्पेस अधिक उठून दिसते. साधेपणा आणि लक्झरी यांचं संतुलन या भागात पाहायला मिळतं.
शैलेश लोढा हे अभिनेता असण्यासोबतच कवी आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घरातील पर्सनल लायब्ररी त्यांच्या वाचन-लेखनाच्या आवडीची झलक देते. पांढऱ्या शेल्फमध्ये अनेक पुस्तकं व्यवस्थित ठेवलेली आहेत. टेबलवर कागदपत्रं आणि फाइल्सही दिसतात. लाकडी फ्लोअरिंग, आरामदायी गाद्या आणि छोटी टेबल यामुळे हा भाग निवांतपणे वाचन किंवा लेखन करण्यासाठी योग्य वाटतो.
घरातील सर्वात वेगळ्या जागांपैकी एक म्हणजे ‘रेड रूम’. लाल रंगाच्या इंटीरियरमुळे या खोलीला थिएट्रिकल वातावरण मिळतं. प्रोजेक्टर आणि आरामदायी बैठकव्यवस्थेमुळे इथे चित्रपट किंवा कार्यक्रम पाहण्याचा खास अनुभव घेता येतो. रंगीत कुशन आणि आरामदायी सीटिंगमुळे हा भाग घरातील मनोरंजनासाठी तयार करण्यात आल्याचं दिसतं.
घरातील किचनही साधं, स्वच्छ आणि आधुनिक आहे. पांढऱ्या कॅबिनेट्ससोबत काळ्या-ग्रे काउंटरटॉपचा वापर करण्यात आला आहे. मॉड्युलर सेटअपमध्ये ओव्हन, चिमनी आणि फ्रिज व्यवस्थित बसवण्यात आले आहेत.