
बाहेरचं अन्न किंवा जंक फूड हे आपल्या आरोग्यासाठी विषासमान असते. घरी तयार केलेले ताजे पदार्थ खाणं आपल्या तब्येतीसाठी हितकारक असते, मात्र घरात तयार केलेल्या पदार्थांमुळेही आपले नुकसान झाले तर ? खरं सांगायचं तर जेवण तयार करताना लोकं काहीवेळा अशा चुका करतात, जे धोकादायक असते. त्याबद्दल जाणून घेऊया.

मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. स्वयंपाक करताना त्यात मीठ घालणं खूप गरजेचं आहे, पण मीठाच्या अति वापरामुळे तुम्हाला हाय बीपी, स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाला सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ सेवन करावं. मात्र काही लोक चवीच्या नादात जास्त मीठ सेवन करतात.

स्वयंपाक करताना आपण कोणते तेल वापरत आहोत, याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. काही व्यक्ती विचार न करता कोणत्याही तेलात पदार्थ बनवतात. मात्र या चुकीमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

मीठाप्रमाणेच आपण साखरेशिवायही एखादा पदार्थ बनवू शकत नाही. मधुमेह झाल्यानंतर लोक साखर खाणं टाळतात. मात्र सामान्य जीवनात लोक जास्त साखरेचं सेवन करणं पसंत करतात. या चुकीमुळे ब्लड शुगर वाढू शकते तसेच इतर आजारही उद्भवू शकतात.

आजच्या काळात अनेक लोकांना रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैद्याचे पदार्थ बनवण्याची सवय झाली आहे. मैद्यामध्ये फायबर नसते आणि त्यात साखरही जास्त असते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सतत खाणे हे चुकीचे व नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.