
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, तरीही प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याच्या कथेला आणि विषयाला पसंती मिळतेय. 'मुंज्या'ची कल्पना कुठून मिळाली, याविषयी आदित्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य सरपोतदार म्हणाला, "आपल्याकडे चित्रपटांसाठी विषयांची कमतरता नाही. मुंज्या ही ब्रह्मराक्षसाची कथा आहे. या कथा कोकणात, महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. अशा कथांवर चित्रपट का बनत नाहीत, असा प्रश्न मला लहानपणापासूनच पडायचा."

"अशाच एका लोककथेवर आधारित 'कांतारा' हा चित्रपट खूप गाजला. तिथूनच मला मुंज्यासाठी प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रात, देशात, अनेक प्रांतात अशा कित्येक कथा आहेत, त्यावर चित्रपट बनवले जाऊ शकतात", असं आदित्यने सांगितलं.

या चित्रपटाविषयी त्याने पुढे सांगितलं, "हा हॉररपेक्षा कॉमेडी चित्रपट आहे. 10 ते 20 वर्षांच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून मी हा चित्रपट बनवला आहे. आम्ही खऱ्या लोकेशन्सवर जाऊन या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे."

कोकणात झालेलं शूटिंग, मराठी घरात घडणारी गोष्ट असल्याने एकापेक्षा एक चांगले मराठी कलाकार आणि उत्तम व्हीएफएक्सच्या माध्यमातून मुंज्यासह रंगवणाऱ्याचा केलेला प्रयत्न या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.