
एमसीएचआय क्रेडाई यांच्या वतीने कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित बांधकाम व्यावसायिक आणि गृह खरेदीदारांसमोर मुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केले.

कल्याण डोंबिवली या परिसराचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदलला असून या भागात अनेक विकासकामे आज प्रगतीपथावर आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत व्यक्त केले. बांधकाम क्षेत्र हे लाखो हातांना रोजगार देत असल्याने या क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने कायमच केला असल्याचे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

कल्याण डोंबिवली तळोजा या मेट्रो मार्ग ५ चे कामही सध्या प्रगतीपथावर असून या मेट्रोमुळे या शहरातून मुंबईकडे होणारा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. तसेच ऐरोली-काटई टनेल रोडचे कामही अंतिम टप्प्यात असल्याने डोंबिवली ते ऐरोली हे अंतर १५ ते २० मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे. मेट्रोसारख्या सुविधा निर्माण द्यायच्या तर मेट्रो सेस देखील द्यावा लागेल असे मत यासमयी बोलताना व्यक्त केले.

राज्य सरकारने रेडीरेकनर आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन यांच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. बांधकामासाठी लागणारी वाळू देखील ६०० रुपये ब्रास दराने उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या निर्णयांचा लाभ गृहखरेदीदारांना नक्की मिळेल आणि परवडणाऱ्या दरातील घरे निर्माण होतील अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली.

याप्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, कल्याणमधील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक रवी पाटील, रौनक ग्रुप आणि एमसीएचआय क्रेडाईचे राजन बांदेलकर तसेच एमसीएचआय क्रेडाईचे सदस्य असलेले कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व प्रमुख बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.