
नागपुरात एकीकडे राजकारणाचा पारा गरम झाला असताना पावसाने मात्र वातावरणात गारवा निर्माण केला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे.

अवकाळी पाऊस, गारपीटने विदर्भातील शेती शिवारात असणारे पीक उद्ध्वस्त झालंय. गारांच्या तडाख्याने टरबूज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील डांगराचे पीक मातीमोल झालंय.शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय.

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील अल्पभूधारक शेतकरी हिम्मत खंडेराव शिंदे यांच्या 3 एकर ज्वारी पिकांचं वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं प्रचंड नुकसान झालं आहे. आचारसंहितेचा नियम बाजूला ठेवून जिल्हा प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अकोला जिल्हातील अकोट तालुक्यातील रूईखेड परिसरातील पणज, चोचरा, महागाव, मार्डी परिसरात अवकाळी पाऊस झाला. या वादळी वारा आणि गारपीटमुळे गहू, हरभरा, ज्वारी, आंबा, संत्रा पिकांसह केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फळबागांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने उभी असलेली ज्वारी पिके आडवी पडली आहेत. लातूरमध्ये अजूनही ढगाळ वातावरण असून वातावरणातील गारठा काही प्रमाणात कमी झाला आहे. ४२ अंशावर गेलेले तापमान आता खाली आले आहे.