एक होता जीतू सैनी, स्वत:च्या वाढदिवशी मोठा कांड करणारा मिस्टर UP चा एन्काऊंटरमध्ये गेम ओव्हर
जीतू इन्स्टाग्रामवर खूप एक्टिव होता. जीतू आपल्या जीमसह अन्य प्रसंगाचे फोटो इन्स्टावर अपलोड करायचा. इन्स्टावर त्याचे 4000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. त्याला बॉडी बिल्डिंगचा शॉक होता.

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात छोट्याशा मुद्यावरुन तीन मित्रांची हत्या करणारा आरोपी जीतू सैनीचा पोलीस एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला आहे. मित्रांची हत्या केल्यानंतर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीवीआर घेऊन जीतू फरार झाला होता.

पोलिसांची टीम त्याचा शोध घेत होती. स्कूटीवर असलेल्या जीतूला पोलिसांनी गुरुवारी सकाळी 5 वाजता थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने उलट पोलिसांवरच गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत तो मारला गेला.

बुलंदशहर जिल्ह्याच्या खुर्जा येथे RJS फिटनेस जीममध्ये 25 एप्रिलच्या रात्री जीतू सैनीची बर्थ डे पार्टी होती. त्यावेळी मित्र अमरदीपने मस्करीत जीतूच्या चेहऱ्यावर केक फासला. बस, इतक्याशा गोष्टीवरुन जीतू भडकला. त्याने जीममध्येच आपल्या मित्रांवर गोळीबार सुरु केला.

या गोळीबारात अमरदीप (32), आकाश (19) आणि मनीष (30) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरुन जीममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील डीवीआर घेऊन फरार झाला. या तिहेरी हत्याकांडाने राज्यात एकच खळबळ उडवून दिली.

पोलिसांनी आरोपी जीतूचा शोध सुरु केला. काही दिवस तो सापडत नव्हता. अखेर गुरुवारी सकाळी 5 वाजता पोलिसांनी त्याला घेरलं. यावेळी त्याने आत्मसमर्पण करण्याऐवजी पोलिसांवर फायरिंग केली. पोलिसांनी त्याच्यावर प्रत्युत्तराची कारवाई केली. यात तीन गोळ्या लागल्याने तो जखमी झालेला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.