
नाटक असो, सिनेमा असो, मालिका असो किंवा वेब सीरिज.. या चारही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले. विविधरंगी भूमिकांमध्ये त्यांना आतापर्यंत आपण पाहत आलोय.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'वचन दिले तू मला' मालिकेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत दिसणार आहेत. वैभव मांगले मुळचे कोकणातले त्यामुळे कोकणी, मालवणी आणि वऱ्हाडी या तिन्ही बोलीभाषा अगदी सफाईने बोलतात.

जगन्नाथ गुडपल्लीवार हे पात्र बेळगावी असल्यामुळे या पात्राच्या निमित्ताने बेळगावी भाषेचा गोडवाही ते अनुभवणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या पात्राविषयी सांगताना वैभव मांगले म्हणाले, "अतिशय वेगळं पात्र आहे."

"खूप इमानदार आहे असं त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. पण जेव्हा खरोखर अन्याय होतो तेव्हा पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यायची त्याची तयारी असते. गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल करून घेणं ही त्याची विशेष हातोटी," असं त्यांनी सांगितलं.

तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि सिस्टीम कोळून प्यायलेला जगन्नाथ गुडपल्लीवार साकारताना खरंच वेगळा अनुभव मिळत असल्याचं ते म्हणाले. प्रेक्षकांना हे पात्र आवडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.