दुसऱ्याच्या हातात थेट मीठ देण्यापूर्वी 10 वेळा विचार करा; अन्यथा…
वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी मीठ खरेदी करणे किंवा कोणाला देणे आर्थिक नुकसानीचे ठरू शकते. मिठाशी संबंधित महत्त्वाचे नियम आणि सकारात्मक ऊर्जेसाठी करायचे उपाय या बातमीतून जाणून घ्या.

भारतीय संस्कृतीत मिठाला केवळ अन्नाची चव वाढवणारा घटक मानले जात नाही, तर त्याला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आणि वास्तुशास्त्रातील एक महत्त्वाचे साधन मानले जाते.

स्वयंपाकघरातील या साध्या दिसणाऱ्या पदार्थाचा संबंध थेट आपल्या आर्थिक स्थितीशी आणि घरातील सुख-शांतीशी असतो. वास्तुशास्त्रानुसार, मिठाच्या वापराबाबत काही कडक नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन न केल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते.

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मीठ खरेदी करणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की, संध्याकाळी मीठ विकत घेतल्याने घरातील आर्थिक समृद्धीवर गदा येते. या कृतीमुळे देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते, ज्यामुळे विनाकारण खर्च वाढतात. तसेच कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो.

मिठाचे दान करणे हे पुण्याचे काम मानले जाते. विशेषतः शुक्रवारी मीठ दान करणे शुभ असते. मात्र, हे दान करताना दोन महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. मिठाचे दान कधीही संध्याकाळी करू नये.

रात्रीच्या वेळी कोणालाही मीठ दिल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि गरिबी येण्याची शक्यता असते. कधीही एका हाताने दुसऱ्याच्या हातात थेट मीठ देऊ नये. शास्त्रांनुसार, थेट मीठ दिल्याने देणाऱ्या व्यक्तीची पुण्यकर्मे घेणाऱ्याकडे हस्तांतरित होतात. त्यामुळे दोघांमधील संबंधांत कडूपणा येऊ शकतो.

मिठाचा संबंध ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाशी जोडला जातो. संध्याकाळी मिठाची देवाणघेवाण केल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो. शुक्र हा सुख, सोयी आणि वैवाहिक आनंदाचा कारक असल्याने, तो कमकुवत झाल्यास पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील शांतता भंग पावू शकते.

जर तुम्हाला घरात नकारात्मकता जाणवत असेल, तर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. शुक्रवारी लाल रंगाच्या कापडात थोडे मीठ बांधून त्याची पोटली तयार करावी. ही पोटली स्वयंपाकघरात किंवा घराच्या अशा ठिकाणी ठेवावी जिथे कोणाची सहज नजर पडणार नाही. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)