
'झी मराठी' वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यामध्ये नुकतंच अंशुमनचं खरं रुप सर्वांसमोर आलं आहे. त्यामुळे स्वानंदीबद्दल समरच्या मनात थोडा का होईना विश्वास निर्माण झाला आहे.

मल्लिकाच्या कटकारस्थानामुळे समर आणि स्वानंदीच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी तिरस्कार होता. परंतु प्रेक्षक ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होते, अखेर तो क्षण या मालिकेत पहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदीमध्ये आता मैत्रीचं नातं निर्माण होणार आहे.

फेब्रुवारी महिना म्हटलं की 'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमासाठीचा खास दिवस येतोच. समर आणि स्वानंदी हे त्यांच्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करणार आहेत. यासाठी केक, कँडल लाइट डिनर आणि सुंदर सजावट असा रोमँटिक प्लॅन आधीच केलेला असतो.

हा रोमँटिक प्लॅन वाटून समर आणि स्वानंदी दोघंही अस्वस्थ होतात. "मला हे सेलिब्रेशन वगैरे असलं काहीच जमणार नाही", असं समर स्वानंदीला स्पष्ट सांगून टाकतो. तेव्हा स्वानंदीसुद्धा म्हणते, "मलाही जे जमणार नाहीये. आता या सगळ्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकता का?"

स्वानंदीने समरसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तोसुद्धा तिची ही ऑफर स्वीकारतो आणि अखेर व्हॅलेंटाइन डेनिमित्त या दोघांमध्ये मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. यानंतर पुढच्या 28 दिवसांत या मालिकेत प्रेक्षकांना रंजक कथा पहायला मिळणार आहे.