
हल्ली आपण रस्त्यावरून धावणाऱ्या बहुतांश नवीन गाड्यांच्या छतावर मागील बाजूस शार्क माशाच्या परासारखा (Fin) एक छोटासा आकार पाहतो. अनेकजण याला केवळ स्टाईल किंवा डिझाईनचा भाग समजतात. पण तुम्हाला माहितीये का हा केवळ शोभेचा भाग नसून कारमधील एक अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक उपकरण आहे.

तुमच्या कारच्या छतावर मागील बाजूस शार्क माशाच्या परासारखा असलेल्या या छोट्या भागाला शार्क फिन अँटेन असे म्हटले जाते. जुन्या गाड्यांमध्ये रेडिओ ऐकण्यासाठी लांब आणि लवचिक वायरसारखे अँटेना असायचे.

मात्र बदलत्या टेक्नोलॉजी प्रमाणे आता त्या लांब अँटेनाची जागा या छोट्या आणि स्टायलिश शार्क फिन अँटेनाने घेतली. हा अँटेना कारच्या छतावर बसवलेला असतो. तो अधिक सुरक्षित व कार्यक्षम मानला जातो.

या शार्क फिन अँटेनाचे सर्वात प्राथमिक काम म्हणजे हवेतील रेडिओ लहरी पकडणे. तुम्ही गाडीत जे FM किंवा AM रेडिओ ऐकता, त्याचे सिग्नल हाच अँटेना खेचून घेतो. जुन्या तारांच्या अँटेनापेक्षा यामुळे अधिक स्पष्ट आवाज येतो.

आज आपण गुगल मॅप्स किंवा इन-बिल्ट नेव्हिगेशन वापरून रस्ता शोधतो. यासाठी गाडीचा उपग्रहाशी (Satellite) संपर्क असणे गरजेचे असते. या छोट्या शार्क फिनमध्ये जीपीएस रिसीव्हर असतो, जो तुम्हाला अचूक रस्ता दाखवण्यास मदत करतो.

जेव्हा गाडी वेगाने धावते, तेव्हा समोरून येणाऱ्या हवेचा मोठा दाब गाडीवर पडतो. जर अँटेना लांब आणि सरळ असेल, तर तो वाऱ्याला अडवतो. मात्र, शार्क माशाच्या शरीरासारखा आकार असल्यामुळे हवा या अँटेनावरून सहज कापली जाते. यामुळे गाडीवरचा भार कमी होतो. तसेच गाडीचा वेग व बॅलन्स चांगला राहतो.

जुन्या प्रकारच्या लांब अँटेनामध्ये अनेक समस्या होत्या. कधी पार्किंगमध्ये गाडी लावताना तो अँटेना अडकायचा, तर कधी कार वॉशमध्ये गेल्यावर तो तुटायचा. शार्क फिन अँटेना हा कडक प्लास्टिकने बनलेला आणि छताला घट्ट चिकटलेला असतो, त्यामुळे तो तुटण्याची किंवा वाकण्याची काळजी नसते.

आजकालच्या स्मार्ट कारमध्ये इंटरनेटची सुविधा असते. गाडीच्या आत असलेले वाय-फाय (Wi-Fi) किंवा इतर स्मार्ट फीचर्स चालू ठेवण्यासाठी लागणारे सिग्नल्स मिळवण्याचे कामही हा छोटासा भाग करत असतो.