
हल्ली तरुण पिढीतील अनेक मुलांच्या तोंडावर सुरकुत्या, केस पांढरे होण्याचे प्रमाण, थकलेला चेहरा दिसणं हे प्रकार वाढले आहेत. यामुळे हल्लीची तरुण पिढीही त्यांच्या वयापेक्षा जास्त प्रौढ दिसते. पण कधी विचार केलाय का, तुमच्या हृदयाचं खरं वय किती आहे? नाही ना. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

आजकाल ३०-३५ वर्षांचे तरुणही हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. यामागचे कारण बदललेली जीवनशैली असे म्हटले जात आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे तुमचा हृदयाच्या वयाशी ताळमेळ बसत नाही. यामुळे आपले हृदय हे खऱ्या वयापेक्षा १५ वर्षांनी मोठं होतं आणि तिथेच धोक्याची घंटा निर्माण होते.

गायनोलॉजिस्ट डॉ. रजनीश कुमार पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार "हृदयाचं वय हे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शारीरिक हालचाल, ताणतणाव, झोप आणि एकंदर जीवनशैली यावर अवलंबून असतं.

अनेक लोकांचं शरीर हे तरुण असतं, पण हृदय मात्र म्हातारं होत जाते. यानंतर मग हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळे आपण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हृदयाचं वय रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, बॉडी मास इंडेक्स, धूम्रपान आणि शारीरिक हालचाली यांसारख्या घटकांवर आधारित असतं. जर तुम्ही या बाबतीत कमकुवत असाल तर तुमच्या हृदयाचं वय खऱ्या वयापेक्षा जास्त असू शकतं.

आपले हृदय आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे दररोज न थांबता काम करत असते. पण आपण त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आज आपण हृदयाशी संबंधित काही धोक्याच्या सूचना जाणून घेणार आहोत.

पायऱ्या चढताना धाप लागणं, सकाळी उठल्यावर थकवा किंवा जडपणा जाणवणं, छातीत जळजळ किंवा दाब जाणवणं, वारंवार थकवा किंवा झोप न लागणं, ताणतणाव, लवकर राग येणं या सर्व धोक्याच्या सूचना आहेत.

जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील, तर त्यावर वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आपल्या हृदयाचं वय कमी करायचे आणि त्याला निरोगी ठेवायचे असेल तर काही सोपे उपाय करणे गरजेचे असते.

दररोज किमान ३० मिनिटं जलद चालण्याचा व्यायाम करा. तसेच आहारात बदल करून फळं, भाज्या, ओमेगा-३ फॅटी ऍसिड युक्त आहार घ्या. धूम्रपान आणि दारूपासून दूर राहा, कारण ते हृदयासाठी अत्यंत हानिकारक आहेत.

त्यासोबतच ८ तासांची गाढ झोप नक्की घ्या. ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा संगीत ऐका. यामुळे तुमचे हृदय नक्कीच ठणठणीत होईल. तसेच तुमचे आरोग्यही निरोगी राहिल.