कोण आहे देशभरात ट्रेंडिंग असलेल्या ‘दिलरुबा दिलनशीन’ या Viral गाण्याचा गायक?
आज ‘दिलरुबा दिलनशीन हे गाणं देशभरात गाजत आहे. याचा गायक नेमका कोण आहे हे अजूनही अनेकांना माहित नाही. या गायकाला इंडियन आयडॉलमध्ये नाकारले होते पण आज त्याचंच गाणं राज्य करत आहे. .

आज ‘दिलरुबा दिलनशीन हे गाणं देशभरात गाजत आहे. याचा गायक रितो रिबा आहे . रितोचा जन्म अरुणाचल प्रदेशमधील पासीघाट येथे झाला. लहानपणापासूनच त्याला संगीताची आवड होती. त्याच्या आईला लोकगीते गाण्याची आवड असल्याने घरातूनच त्याला संगीताचे संस्कार मिळाले.
2014-15 च्या सुमारास रितोने यूट्यूबवर गाण्यांचे कव्हर्स अपलोड करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याने स्वतःची गाणी लिहिणे आणि संगीतबद्ध करणे सुरू केले. याच मेहनतीतून त्याची संगीत क्षेत्रातील ओळख निर्माण झाली.
2022 मध्ये रितोने 'इंडियन आयडॉल 13' मध्ये 'हीर रांझा' हे स्वतःचे गाणे सादर केले. त्याच्या आवाजाने परीक्षक आणि प्रेक्षक प्रभावित झाले. मात्र, त्याला टॉप 15 मध्ये स्थान मिळू शकले नाही. तरीही त्याने हार न मानता संगीताचा प्रवास सुरू ठेवला.
इंडियन आयडॉलनंतर रितोने 'प्ले डीएमएफ' या म्युझिक लेबलअंतर्गत 'हीर रांझा' हे गाणे रिलीज केले. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये शिवांगी जोशी आणि रोहित खंडेलवाल झळकले. या गाण्याला यूट्यूबवर लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळाले. त्यानंतर 'मेरी बनोगी क्या', 'इक तू ही है', 'बस तेरा' आणि 'इबादतें' अशी गाणीही त्याने सादर केली. तसेच श्रेया घोषालसोबत 'प्यार आता है' या गाण्यातही काम केले.
16 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज झालेल्या 'दिलफेक' या पाच गाण्यांच्या EP मधील 'दिलरुबा दिलनशीन' हे गाणे विशेष लोकप्रिय ठरत आहे. रेट्रो-पॉप संगीत, सुंदर शब्द आणि जुन्या काळातील रोमँटिक अंदाज यामुळे हे गाणे इन्स्टाग्राम रील्सवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 16 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, या गाण्याने Shazam India चार्टवर पहिले तर Spotify India Daily Chart वर चौथे स्थान मिळवले.
हिंदी संगीत क्षेत्रात लोकप्रियता मिळवतानाही रितो आपल्या संस्कृतीला विसरलेला नाही. 2025 मध्ये त्याने 'Native Notes' हा पाच गाण्यांचा EP रिलीज केला. यामध्ये त्याची मूळ भाषा गालो (Galo) मधील गाण्यांचा समावेश आहे. 'दिलफेक' या EP मध्ये 'मखमली', 'जोगनिया', 'जख्मी' आणि 'जिक्र हो' ही गाणीही आहेत.