
आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसाला किमान 2 ते 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शुद्धीकरणासाठी अनेक घरांमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी वापरण्याची परंपरा आहे.

तांब्याचे पाणी शरीरातील दोष कमी करते असे मानले जात असले तरी ते सर्वांसाठीच फायदेशीर ठरते असे नाही. विशिष्ट शारीरिक स्थिती असलेल्या लोकांसाठी हे पाणी समस्यांचे कारण बनू शकते. त्यामुळे आज आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी कोणी पिऊ नये, याबद्दल माहिती घेणार आहोत.

मधुमेहाची औषधे सुरू असताना तांब्याचे पाणी प्यायल्यास औषधांचा शरीरावर होणारा परिणाम कमी होऊ शकतो. तसेच मधुमेहामुळे आधीच किडनी कमकुवत झालेली असते. त्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने किडनीवर अधिक ताण येऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यातील पाण्याची प्रकृती मुळात गरम असते. ज्या लोकांच्या शरीरात आधीच उष्णता जास्त आहे किंवा ज्यांना पित्ताचा त्रास होतो, त्यांनी हे पाणी प्यायल्यास शरीरातील उष्णता अधिक वाढू शकते. यामुळे पोटात जळजळ होणे, छातीत जळजळणे किंवा त्वचेवर पुरळ येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

आपले शरीर तांब्यातील अंश एका मर्यादेपर्यंतच पचवू शकते. ज्यांना किडनी किंवा यकृताचे गंभीर आजार आहेत, त्यांच्या शरीराला हे तांब्याचे कण गाळून बाहेर काढणे कठीण जाते. यामुळे रक्तामध्ये तांब्याचे प्रमाण वाढून रक्ताच्या शुद्धीकरणात अडथळे निर्माण होऊ शकतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

लहान मुलांची पचनसंस्था अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते. तांब्याच्या पाण्यातील खनिजे पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा आणि ताकद लागते. लहान मुलांच्या नाजूक पचनशक्तीवर यामुळे ताण येऊ शकतो, ज्यामुळे त्यांना अपचन किंवा उलट्यांसारखे त्रास होऊ शकतात.

कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास ती नुकसान करते. जर तुम्ही दिवसभर फक्त तांब्याच्या भांड्यातीलच पाणी पीत असाल, तर शरीरात तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होऊ शकते. यामुळे जुलाब, मळमळ किंवा पोटदुखी यांसारखे लक्षणे दिसू शकतात.

त्यामुळे तांब्याच्या भांड्यांमधील पाणी पिण्याआधी तुमची प्रकृती कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच जर तुम्हाला वरीलपैकी कोणताही त्रास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तांब्याचे पाणी पिऊ नका. तहान लागेल तेव्हा साधे पाणी पिणे शरीरासाठी कधीही उत्तम मानले जाते.