
आपण रोजच्या जीवनात मोबाईल चार्जरपासून ते फ्रिजपर्यंत अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतो. या उपकरणातील काही प्लगला दोन तर काहींना तीन पिन असतात, पण असे का? आपण तीन-पीन प्लगऐवजी कधी कधी दोन-पिनचा वापर करतो, पण ते सुरक्षित आहे का? आज आपण या तिसऱ्या पिनचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

तीन-पिन प्लगमध्ये 'लाईव्ह' आणि 'न्यूट्रल' अशा दोन पिन विजेच्या प्रवाहासाठी असतात. मात्र, सर्वात वरची जी जाड आणि लांब पिन असते, तिला अर्थ (Earth) किंवा ग्राउंड पिन म्हणतात. ही पिन सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वाचा दुवा असतो.

जर उपकरणात काही तांत्रिक बिघाड होऊन विद्युत प्रवाह गळती (Current Leakage) झाली, तर ही पिन ती वीज थेट जमिनीमध्ये सोडून देते. तुम्ही पाहिले असेल की अर्थ पिन इतर दोन पिनपेक्षा थोडी लांब असते.

याचे कारण असे की, प्लग सॉकेटमध्ये लावताना सर्वात आधी 'अर्थ' पिनचा संपर्क व्हावा. यामुळे उपकरण सुरू होण्यापूर्वीच त्याची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होते. तसेच, ती जाड असल्यामुळे चुकीच्या होलमध्ये बसत नाही.

जर प्लगमध्ये तिसरी पिन नसेल आणि उपकरणाच्या धातूच्या भागातून वीज गळती होत असेल, तर त्याला स्पर्श करताच तुम्हाला जोरदार विजेचा धक्का बसू शकतो. फ्रिज, वॉशिंग मशिन किंवा इस्त्री यांसारख्या धातूच्या वस्तू असलेल्या उपकरणांसाठी ही पिन असणे अत्यंत आवश्यक आहे. ही पिन नसेल तर शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागण्याचा धोकाही वाढतो.

मोबाईल चार्जर किंवा लहान दिव्यांना फक्त दोनच पिन असतात. याचे कारण हे उपकरणे 'डबल-इन्सुलेटेड' (Class II) असतात. त्यांच्या आत प्लास्टिकचे किंवा अशा प्रकारचे कोटिंग असते की विद्युत गळतीचा धोका नसतो. त्यामुळे त्यांना अतिरिक्त अर्थिंगची गरज भासत नाही.