
आपण दररोज शर्ट घालतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का की शर्टची सर्व बटणे ही उभी असतात. पण कॉलरपाशी असलेले सर्वात वरचे पहिले बटण हे मात्र नेहमी आडवे का असते? नाही ना चला आज आपण जाणून घेऊया.

शर्टची सर्व बटणं हे डिझाईन किंवा फॅशनसाठी नसून त्यामागे एक महत्त्वाचे तांत्रिक कारण असते. शर्टच्या या रचनेमुळे बटण तुटण्यापासून वाचते आणि दिवसभर कॉलरची फिटिंग व्यवस्थित राहण्यास मदत होते.

शर्टच्या कॉलरपाशी असलेल्या बटणावर शरीराच्या हालचालींमुळे सर्वाधिक ताण येतो. जेव्हा आपण मान हलवतो किंवा जेवताना गळा वर करतो, तेव्हा हे बटण ओढले जाते.

जर हे बटण उभे असते, तर ताणामुळे ते लवकर तुटण्याची किंवा काजातून निसटण्याची शक्यता जास्त असते. आडवे काज (Buttonhole) या ताणाला अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकते. त्यामुळे बटण आपल्या जागी घट्ट टिकून राहते.

जेव्हा कपड्यावर दाब येतो, तेव्हा उभ्या काजांमधून बटण सहज सरकू शकते. मात्र, आडव्या काजामध्ये बटण काजाच्या अगदी टोकाला जाऊन अडकते, ज्यामुळे शर्ट आपोआप उघडण्याची भीती राहत नाही.

शर्टच्या खालच्या बटणांवर इतका ताण येत नसल्यामुळे ती उभी ठेवली जातात, जेणेकरून शर्ट घालताना आणि काढताना सोपे जावे. कॉलरचे बटण व्यवस्थित बसणे शर्टच्या संपूर्ण फिटिंगसाठी महत्त्वाचे असते.

आडवे बटण शर्टला मानेपाशी व्यवस्थित लॉक करते. यामुळे कॉलरचा आकार बिघडत नाही आणि शर्ट प्रोफेशनल दिसतो. अनेक ब्रँडेड शर्ट्समध्ये सर्वात खालचे बटण देखील आडवे असते.

याचे कारण म्हणजे जेव्हा आपण बसतो, तेव्हा पोटापाशी शर्टवर ताण येतो. हे आडवे बटण तो ताण सहन करून शर्ट फाटण्यापासून किंवा बटण निघण्यापासून वाचवते.