
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन वर्षांच्या कालावधीत बरेच सामने खेळले गेले. या सामन्यांत अनेक उत्तमोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. जर आपण चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्सबद्दल पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 70 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. पण, जर आपण आकडेवारी थोडी अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या स्पर्धेत भारतीय वेगवान गोलंदाजीच्या त्रिकूटाचा जलवा देखील पाहायला मिळू शकतो. वेगवान गोलंदाजांमधील सर्वोत्तम गोलंदाजीच्या सरासरीबद्दल (किमान 10 डाव) जर आपण चर्चा केली तर भारताचे तीन आघाडीचे वेगवान गोलंदाज आहेत, पण जसप्रीत बुमराहचे त्यात नाव नाही.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसन पहिल्या 5 मध्ये अव्वल स्थानावर आहे. जेमीसनने कसोटी चँपियनशिपमध्येच भारताविरुद्ध पदार्पण केले. त्याने 6 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 36 बळी घेतले आणि त्यामध्ये त्याची सरासरी 13.27 म्हणजेच सर्वोत्तम आहे.

भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुसर्या क्रमांकावर आहे. टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये इशांतने 11 सामन्यांच्या 20 डावांमध्ये 17.36 च्या जबरदस्त सरासरीने 36 विकेट्स घेतल्या आहेत.

इशांतनंतर या लिस्टमध्ये आणखी एक भारतीय गोलंदाज आहे तो म्हणजे उमेश यादव. उजव्या हाताच्या वेगवान उमेशने 7 सामन्यांच्या 14 डावांमध्ये 29 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 18.55 एवढी राहिली.

इंग्लंडचा अनुभवी आणि सर्वाधिक विकेट घेणारा जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. अँडरसनने 12 सामन्यांच्या 20 डावांमध्ये 19.51 च्या सरासरीने 39 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद शमी देखील पहिल्या पाच सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये आहे. शमीने आतापर्यंत या स्पर्धेत 10 सामन्यांच्या 18 डावांमध्ये 19.77 च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या आहेत.