‘धुरंधर’च्या वादळात ‘या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं, ठरला ब्लॉकबस्टर, 30 कोटी बजेट अन् कमाई 143 कोटी
'धुरंधर'च्या वादळात देखील या चित्रपटाने केली रेकॉर्ड ब्रेक कमाई. या अभिनेत्याला मिळाला 4 वर्षानंतर पहिला ब्लॉकबस्टर. बजेट 30 कोटी आणि कमाई 143 कोटी.

Nivin Pauly : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत अनेक मोठ-मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
मात्र, 25 डिसेंबर हा दिवस मल्याळम सिनेसृष्टीतील एका बुडत्या वाटेवर असलेल्या कलाकारासाठी खास ठरला आहे. या दिवशी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचेच नाही तर बॉक्स ऑफिसचेही मन जिंकले आहे. हा कलाकार म्हणजे मल्याळम चित्रपटाचा लाडका अभिनेता निविन पॉली आणि त्याच्या चित्रपटाचे नाव ‘सर्वम माया’.
2025 चा शेवट आणि 2026 ची सुरुवात निविन पॉलीसाठी एखाद्या स्वप्नासारखी ठरली आहे. आयएमडीबीच्या माहितीनुसार, ‘सर्वम माया’ चित्रपटाने जगभरात सुमारे 143 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे बजेट फक्त 30 कोटी रुपये होते. मोठ्या बजेटच्या आणि चर्चेत असलेल्या ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘सर्वम माया’ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
यशाचा शिखराकडे प्रवास
‘नेरम’ आणि ‘प्रेमम’ या चित्रपटांमधून निविन पॉलीने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. विशेषतः ‘प्रेमम’मधील जॉर्ज डेविड ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र, 2018 नंतर निविनच्या कारकिर्दीत चढ-उतार सुरू झाले. सॅटरडे नाईट, महावीर्यर, पदावेट्टू, मलयाली फ्रॉम इंडिया हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकले नाहीत. त्यामुळे निविनची प्रतिमा हळूहळू ढासळत चालली होती. इंडस्ट्रीतील जाणकारांचे मत होते की, निविनला त्याच्या अभिनयक्षमतेला साजेशी आणि दमदार स्क्रिप्ट मिळणे गरजेचे आहे.
त्यामुळे अशावेळी त्याला अखेर ‘सर्वम माया’ हीच ती स्क्रिप्ट मिळाली, जिने निविन पॉलीच्या करिअरला नवे वळण दिले. अखिल सत्यन दिग्दर्शित हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटात निविन पॉली एका अशा व्यक्तीची भूमिका साकारतो जो अलौकिक घटनांशी सामना करत असतो. ‘सर्वम माया’ ही निविन पॉलीच्या कारकिर्दीमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला असून या चित्रपटाने 100 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. याच यशामुळे आज निविन पॉलीला इंडस्ट्रीत ‘कमबॅक किंग’ म्हटले जात आहे.
आगामी चित्रपटांकडे चाहत्यांचे लक्ष
‘सर्वम माया’च्या यशानंतर निविन पॉलीच्या आगामी चित्रपटांकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये बेबी गर्ल, येझु कदल येझु मलाई, डिअर स्टुडंट्स, बेथलेहेम कुडुंब युनिट, बेंज या चित्रपटांचा समावेश आहे.
