
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्याचे काही खास फोटो आता समोर आले आहेत. यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसत आहेत.

युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाहसोहळा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

युगेंद्र पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवार यांचे नातू आहेत. तर तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईकर असून त्यांच्या कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमी आहे.

युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या खास कौटुंबिक सोहळ्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते.

युगेंद्र पवार यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर या खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळे यांनी वरातीमध्ये जोरदार डान्स करुन सोहळ्याची रंगत वाढवली.

या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता कुटुंबातील बहुतांश सदस्य उपस्थित होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लग्नाला हजेरी लावली.

तसेच विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हळदी समारंभाला देखील त्या उपस्थित होत्या. अजित पवार सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे जय पवार आणि पार्थ पवार यांनीही या सोहळ्यात हजेरी लावली होती.

युगेंद्र पवार व तनिष्का कुलकर्णी यांच्या या शाही विवाह सोहळ्याला महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक दिग्गजांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

युगेंद्र पवार व तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा ३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत झाला होता. त्यावेळी देखील संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. हा सोहळाही थाटामाटात पार पडला होता.

सर्व फोटो - सुप्रिया सुळे/ इन्स्टाग्राम