अरुण जेटलींच्या अंत्यसंस्कारावेळी बाबुल सुप्रियोंसह 11 जणांचे मोबाईल चोरीला

माजी अर्थमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्कारा दरम्यान तब्बल 11 मोबाईलची चोरी झाली आहे. रविवारी (25 ऑगस्ट) निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुण जेटलींच्या अंत्यसंस्कारावेळी बाबुल सुप्रियोंसह 11 जणांचे मोबाईल चोरीला
| Edited By: | Updated on: Aug 27, 2019 | 8:24 AM

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्कारा दरम्यान तब्बल 11 मोबाईलची चोरी झाली आहे. रविवारी (25 ऑगस्ट) निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेटलींच्या अंत्यसंस्कारा दरम्यान झालेल्या मोबाईल चोऱ्यांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आलं आहे.

यामध्ये भाजप खासदार बाबुल सुप्रियो आणि इतर 10 लोकांचेही मोबाईल चोरीला गेले आहेत. पतंजलीचे प्रवक्ता एस. के. तिजारावाल यांनी सोमवारी (26 ऑगस्ट) या प्रकरणाची माहिती दिली.

“रविवारी संध्याकाळी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्कारा दरम्यान, माझा, माजी मंत्री आणि खासदार बाबुल सुप्रियो आणि इतर 9 जणांचा मोबाईल चोरी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ते सर्व फोन ट्रॅकिंगवर लावले आहेत”, असं तिजारावाला यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

“ही चोरी नाही, तर खूप चलाखीने आपले खिसे कापले आहेत. एकाच जागेवरुन आपल्या 6 लोकांचे फोन गायब झाले. मी स्वत:ला वाचवण्यासाठी त्या मुलाचा हात पकडला पण तो पळाला. मला असं सांगितलं आहे की, कमीत कमी 35 लोकांचे फोन गायब आहेत”, असं बाबुल सुप्रियो यांनी तिजारावाला यांच्या ट्वीटरला उत्तर देताना म्हटले.

दरम्यान, अरुण जेटलींच्या अंत्यसंस्कारा दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला उपस्थित होते.