तर तिकडून आमचा बिस्मिल्लाह होऊ शकतो; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?

| Updated on: Sep 24, 2022 | 10:26 AM

आजच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. राज्यामध्ये एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सोन्याच्या चमच्याने दूध पिणारेच मुख्यमंत्री होऊ शकतात, असं काही लोकांना वाटत आहे.

तर तिकडून आमचा बिस्मिल्लाह होऊ शकतो; अब्दुल सत्तार असं का म्हणाले?
अब्दुल सत्तार असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वाशिम: राज्याचे कृषी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. आधी आम्ही निवडणुकीपूर्वी भाजपसोबत (bjp) युती केली. 2019मध्ये फारकत घेतली. आता इकडून जर आमची फारकती झाली तर तिकडून आमचा बिस्मिल्लाह करायला काही कमी आहेत का?; असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. सत्तार यांनी ही कबुली देऊन अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारचा (central government) शिंदे गटावर दबाव असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

मी तर अडीच वर्षाचा शिवसैनिक आहे. पण आमच्या ताई (भावना गवळी) लहान पानापासून शिवसैनिक आहेत. त्या अडचणीत असताना आमच्या पक्ष प्रमुखाला त्यांना भेटण्यासाठी दोन मिनिटं वेळ नाही. पण एकनाथ शिंदे रात्री दोन वाजता धावून आले. पाच वेळा निवडून येणाऱ्या खासदाराची ही अवस्था असेल तर माझ्यासारख्या अडीच वर्षाच्या शिवसैनिकाचे काय हाल होतील. हे बघूनच मी शिंदेच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.

मी तर जातीने मुसलमान आहे. पण माझाही विश्वास त्या हिंदुत्ववादी संघटनेवर आहे. कारण ते हिंदुत्वाची भाषा आत्मा आणि परमात्म्याला साक्षी ठेवून बोलतात. माझ्या मतदारसंघात तीन लाख हिंदू आहेत आणि 50 हजार मुसलमान. माझ्या विरोधात एकच हिंदू उभा करतात. दुसरा उभा राहिला तर त्याला जातीतून बाहेर काढण्याची धमकी देतात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला. मुख्यमंत्री अठरा अठरा तास काम करतात. त्यांच्या कामाच्या वेळेवरही टीकाटिप्पणी होऊ लागली. ते सकाळी 5 वाजेपर्यंत काम करतात तर झोपतात कधी? असा सवाल अजित पवार यांनी केली आहे. विरोधी पक्ष तितकीच संधी शोधत आहेत. केव्हा हे झोपतील आणि ते कामाला लागतील, असा टोला त्यांनी लगावला.

आजच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. राज्यामध्ये एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सोन्याच्या चमच्याने दूध पिणारेच मुख्यमंत्री होऊ शकतात, असं काही लोकांना वाटत आहे. परंतु एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेला माणूस आहे. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून त्यांची ओळख आहे. साताऱ्यावरून मुंबईला जाणं आणि ठाण्याची सत्ता काबीज करणे एवढं सोपं काम नाही, असंही त्यांनी सांगितलं.

काही लोक म्हणतात रिक्षावाला मुख्यमंत्री कसा झाला? अरे एका रिक्षामध्ये 50 आमदार बसून जो माणूस राजकारणाची स्वारी करतोय तो माणूस सामान्य माणसाचा नेता आहे. पूर्वी काम करताना काही अडचणी आमच्या समोर होत्या. त्या आता दूर झाल्या. राज्य सरकार वेगळ्या पक्षाचे केंद्र सरकार वेगळ्या पक्षाचं अशी अडचण होती. ती आता दूर झाली आहे, असंही ते म्हणाले.