राज ठाकरेंना ‘जाणता राजा’ म्हणण्याचं कारण… : संजय नार्वेकर

| Updated on: Jan 23, 2020 | 3:48 PM

राजसाहेबांचा शॉर्टफॉर्म 'राजा' असा होतो. त्यामुळे 'जाणता राजा', असं संजय नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरेंना जाणता राजा म्हणण्याचं कारण... : संजय नार्वेकर
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा कलाकारांना जाणणारा ‘जाणता राजा’ आहे, अशा शब्दात प्रख्यात अभिनेते संजय नार्वेकरांनी (Sanjay Narvekar on Raj Thackeray) स्तुतिसुमनं उधळली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष संजय नार्वेकर यांनी ‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ हा ठराव मांडला.

मध्यमवर्गातून वर आलेल्या माझ्यासारख्या अनेक कलावंतांना स्वस्त दरात, नियमाने परडवणारी घरं मिळावीत म्हणून स्वत: राज ठाकरेंनी स्वतः पाठपुरावा केला. असा मराठी कलाकारांना जाणणारा हा ‘जाणता राजा’ आहे, असं संजय नार्वेकर म्हणाले.

यावरुन वादंग होईल, म्हणून स्पष्टीकरण देतो, राजसाहेबांचा शॉर्टफॉर्म ‘राजा’ असा होतो. त्यामुळे ‘जाणता राजा’, असंही संजय नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

संजय नार्वेकरांनी कलाकारांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे ठरावात मांडले. “छत्रपती शिवाजी महाराजांची खरं स्मारकं असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, नाट्यगृहांची दुरावस्था सुधारावी. प्रायोगिक रंगभूमी जोपासणं ती वृद्धिंगत करणं गरजेचं, मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा आणि मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान मिळालंच पाहिजे, त्यासाठी आम्ही कार्यरत राहू”, असं नार्वेकर म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठराव मांडून अमित ठाकरेंचं धडाक्यात लाँचिंग केलं.

मनसेची शॅडो कॅबिनेट

इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात ‘शॅडो कॅबिनेट’ची संकल्पना राबवण्याची चिन्हं आहेत. राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी मनसेतून एक-एका नेत्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.

मनसेचा नवा झेंडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत.

Sanjay Narvekar on Raj Thackeray