विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे होणार‘शिवसंग्राम’च्या अध्यक्षा?

| Updated on: Sep 06, 2022 | 7:58 PM

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी एक जागा ज्योतीताई मेटे यांना द्यावी. शिवसंग्रामसाठी दिलं जाणारं विधानपरिषद सदस्यत्व आणि विधिमंडळात स्थान दिलं पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे.

विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे होणार‘शिवसंग्राम’च्या अध्यक्षा?
Follow us on

पुणे : शिवसंग्राम पक्षाचे (Shivsangram) अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधन झाले. मेटे यांच्या निधनानंतर ‘शिवसंग्राम’ची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झालाय. याचं उत्तर शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच शोधलयं. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामचं नेतृत्व करावं अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला ज्योती मेटे या देखील उपस्थित होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्योती मेटे यांना पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली. आजच्या राज्यकारिणीत नेतृत्वाची धुरा देण्याचा निर्णय जो घेतलाय त्यासंदर्भात मी योग्य तो निर्णय घेईन असे ज्योती मेटे म्हणाल्या.

विनायक मेटे यांच्या निधनानंतर संघटना नेतृत्वहीन आहे. अनेक प्रश्न घेऊन शिवसंग्राम पक्ष लढत होता. विनायक मेटेंच्या उमेद्वारीबाबत भाजप आणि शिवसेना युतीने निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी एक जागा ज्योतीताई मेटे यांना द्यावी. शिवसंग्रामसाठी दिलं जाणारं विधानपरिषद सदस्यत्व आणि विधिमंडळात स्थान दिलं पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात शिवसंग्रामचे शिष्टमंडळ भाजपचं नेतृत्वाला भेटणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांची देखील हे शिष्टमंडळ भेट घेऊन विधानपरिषद सदस्यत्वाची मागणी करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगीतले.

14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण 150 मीटर अगोदर विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने दोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मेटेंचा मृत्यू झाला.

विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मेटे यांच्या निधनानंतर त्या सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. परंतू पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेण्याबाबत ज्योती मेटे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.