पुन्हा शिवरायांच्या नावे मतं मागू नका, अरविंद जगतापांचा संताप

| Updated on: Oct 31, 2019 | 2:19 PM

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात मार्मिक पत्र लिहून सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी परिचित असलेल्या अरविंद जगताप यांनी युती-आघाडीवर निशाणा साधला आहे

पुन्हा शिवरायांच्या नावे मतं मागू नका, अरविंद जगतापांचा संताप
Follow us on

मुंबई : स्वतःच्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी दाखवू नका, महाराजांच्या नावे मतं मागू नका” अशा शब्दात ‘चला हवा येऊ द्या’ फेम पत्रलेखक आणि कवी अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी संताप व्यक्त केला आहे. जगताप यांनी फेसबुकवरुन सर्व राजकीय पक्षांना धारेवर धरलं आहे. ‘स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, पण नेतानिवडीसाठी नाही’ असा तिरकस निशाणाही (Arvind Jagtap on Politics) त्यांनी साधला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात मार्मिक पत्र लिहून सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी अरविंद जगताप परिचित आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेल्या राजकारणावर अरविंद जगताप यांनी आपल्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरुन तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.

फेसबुकवर शिवाजी महाराजांची कथा सांगणारी एक पोस्ट लिहून राजकीय नेत्यांवर अरविंद जगताप यांनी आसूड उगारला आहे. महाराष्ट्र कोणा पटेल किंवा शाहांची वाट का पाहत आहे? असा जळजळीत सवाल जगतापांनी राजकारण्यांना केला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत असून तुफान व्हायरलही झाली आहे.

काय आहे पोस्ट?

“गुजरातचे त्याकाळचे सत्ताधारी लोक एक मराठी राजा येईल म्हणून घाबरायचे. त्या मराठी राजांचं नाव होतं शिवाजी महाराज. आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो? कधी अहमद पटेल. कधी अमित शहा. आघाडी आणि यूतीत धमक नाही. स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी नका दाखवू. पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मत मागू नका. स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे. नेतानिवडीसाठी नाही.”

अरविंद जगताप यांच्या पोस्टला 15 तासात साडेचार हजारापेक्षा जास्त रिअॅक्शन मिळाल्या आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त यूझर्सनी ही पोस्ट (Arvind Jagtap on Politics) शेअर केली आहे. तीनशेपेक्षा जास्त जणांनी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत सहमती दर्शवली आहे.

वाचा : आधी संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला, आता राष्ट्रवादीचा आमदार राज ठाकरेंच्या घरी!