Imtiaz Jaleel | औरंगाबादेत पुढचा महापौर एमआयएमचा, खा. इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य, भाजपसहित शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीवर चौफेर टीका

| Updated on: Aug 05, 2022 | 1:40 PM

शहराचं नावं राजकीय फायद्यासाठी बदलायचं आहे. मुसलमान औरंगजेबाला फॉलो करत नाहीत. इतिहासाचा तो एक भाग आहे. तुम्ही इतिहासाचं पान फाडू शकता पण इतिहास बदलू शकत नाहीत, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलं.

Imtiaz Jaleel | औरंगाबादेत पुढचा महापौर एमआयएमचा, खा. इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य, भाजपसहित शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीवर चौफेर टीका
खासदार इम्तियाज जलील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेत (Aurangabad municipal Corporation) पुढचा महापौर एमआयएमचाच (MIM) होणार, असं मोठं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलं आहे. दिल्लीत आज त्यांनी टीव्ही9 शी बोलताना हे वक्तव्य केलं. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. भाजपनेच शिवसेनेत भांडणं लावून दिली असून मुंबई महापालिका मिळाल्यानंतर भाजपचे खरे मनसुबे उघडले पडतील, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. एमआयएम टीआरपी मिळवण्यासाठी बोलतो , एमआयएम ही भाजपची बी टीम असे आरोप वारंवार केले जातात. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यातही अब्दुल सत्तार यांनी असे आरोप केले होते. त्याला खा. जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय. औरंगाबादच्या नामांतराला आजही विरोध असून केवळ राजकीय फायद्यासाठी शहराचं नामांतर होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.

‘काँग्रेस-राष्ट्रवादी गरजेनुसार सेक्युलर’

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गरजेनुसार, सेक्युलर होतात. मात्र राजकारण करायचं असतं तेव्हा एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. मात्र आता मुस्लिमांचा मोठा व्होट बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर गेलाय, असं वक्तव्य त्यांनी केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठकीला बोलावलं म्हणून मी आलो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतल्याची माहितीही खा. जलील यांनी दिली.

‘भाजपाला फक्त मुंबई हवीय’

भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीवर बोलताना खा. जलील म्हणाले, भाजपा फक्त शिवसेनेचा उपयोग करत आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणे, हाच त्यांचा उद्देश आहे. एकदा का मुंबईवर कब्जा झाला की ते कोणाला कुठे सोडून देतील माहिती नाही. भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते. मुंबई महापालिका भाजपला घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेत भांडणं लावलीत. आणि त्यात भाजपा यश मिळालं आहे.

‘अब्दुल सत्तार फुकटचे भपके’

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एमआयएमवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना खा. जलील म्हणाले, ‘ अब्दुल सत्तार फूकटाचे भपके आहेत. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाहीत.

‘औरंगाबादचा इतिहास बदलू शकणार नाहीत’

संभाजीनगर नामांतरावरून बोलताना खा. जलील म्हणाले, ‘ संभाजीनगर नामांतर करण्यास आजही माझा विरोध आहे. संभाजी राजेंबद्दल माझ्या मनात आदर आहे. ज्या शहरात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही, शहराचं नावं राजकीय फायद्यासाठी बदलायचं आहे. मुसलमान औरंगजेबाला फॉलो करत नाहीत. इतिहासाचा तो एक भाग आहे. तुम्ही इतिहासाचं पान फाडू शकता पण इतिहास बदलू शकत नाहीत, असं खा. जलील यांनी सांगितलं.

‘तिरंगा डीपीत नाही तर रक्तात आहे’

हर घर तिरंगा मोहिमेत प्रत्येकाने आपापल्या डीपीत तिरंगा लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यावर खा. जलील यांनी सणकून टीका केली. ‘ तुमच्या आणि माझ्या पैशातून नरेंद्र मोदी पब्लिसिटी करतायेत. आम्ही झेंडा डीपीवर लावत नाहीत. तिरंगा आमच्या रक्तात आहे. लसीकरणावरही मोदींचा फोटो आहे. घरावर झेंडा नाही लावला तर तुम्ही देशद्रोही ठरवणार का? माझ्या घरावर बघायला येतील त्यांनी झेंडा लावला की नाही… 2014 पासून 15 ऑगस्टला मी तिरंगा यात्रा काढतो त्याची प्रेरणा नरेंद्र मोदींनी घेतली.
मुसलमानही टोपी घालून तिरंगा गाडीवर लावून फिरतो… असं खा. जलील यांनी ठणकावून सांगितलं.