‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, बच्चू कडूंचा रोख कुणाकडे?

| Updated on: Oct 30, 2022 | 10:07 AM

आमदार बच्चु कडू यांचं विधान चर्चेत...

धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!, बच्चू कडूंचा रोख कुणाकडे?
Follow us on

यवतमाळ : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. बच्चू कडू यवतमाळमध्ये बोलताना त्याचाच प्रत्यय आला. ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, कुणाचंही नाव न घेता असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी हा टोला नक्की कुणाला लगावला? याबाबत चर्चा झाली. बच्चु कडू यांनी हा टोला रवी राणा (Ravi Rana) यांना लगावल्याचं बोललं जातंय.

मी 15 वर्ष मेहनत केली. दिव्यांगांसाठी काम केलं. 150 गुन्हे दाखल करून घेतले. सत्ता हा महत्वाचा विषय नाही. लोकांचे प्रश्न सुटायला हवेत. कार्यकर्ते हे सेवेच्या भावनेतून पेटून उठला पाहिजे. दोन शाखा कमी करा, पण मजबूत शाखा तयार करा, असं बच्चू कडू म्हणाले.

फुकटची प्रसिद्ध म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. हनुमान चालीसा म्हणता येत नाही. तरी चालले तिकडं हनुमान चालीसा म्हणायला. अशावेळी हनुमानने गदा मारली मागून तर समजेल यांना, असं म्हणत त्यांनी रवी राणा यांना टोला लगावलाय.

मशीद-मंदिरसाठी दंगल होते. शाळेसाठी दंगल झालेली मी कधी पाहिली नाही. सण उत्सवावर लाखो रुपये खर्च करता. त्यातले 1 लाख वाचवा आणि समाजासाठी खर्च करा, असा सल्लाही बच्चू कडू यांनी राजकीय मंडळींना दिलाय.

दरम्यान, रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मथ्यस्थी करणार आहेत. शिंदे यांच्या भेटीसाठी रवी राणा हे अमरावतीहून रवाना झाले आहेत. ते आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना देखील भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे हा वाद मिटणार का हे पाहाणं महत्वाचं असेल.