Pankaja Munde | पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकरांच्या गाडीचा ताफा अडवला, बीड दौऱ्यावर असताना तणाव

विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली असती तर महाराष्ट्रातील राजकारणात त्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्या असत्या. मात्र ही संधी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

Pankaja Munde | पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकरांच्या गाडीचा ताफा अडवला, बीड दौऱ्यावर असताना तणाव
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 6:24 PM

बीडः विधान परिषदेची (Vidhan Parishad) उमेदवारी नाकारल्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मराठवाड्यातील विविध भागात अनेक ठिकाणी ही अस्वस्थता दिसून येत आहे. आज बीडमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आज बीड दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. पंकजा ताईंच्या नावाने हे कार्यकर्त्ते घोषणाबाजी करत होते. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी न दिल्याने मुंडे समर्थक आक्रमक झालेत. आज सकाळी पारगाव तर दुपारी बीड शहरातील धांडे नगर परिसरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान मुंडे समर्थकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यावेळी गाडी न रोखल्यानं पंकजा समर्थक थेट गाड्यासमोर आडवे झाले. त्यामुळे मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय.

कुठे घडली घटना?

प्रवीण दरेकर हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुढे निघत असताना पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकर आणि फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गाडी न रोखल्यानं पंकजा समर्थक थेट गाड्यासमोर आडवे झाले. त्यामुळे मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. भाजपकडून मुंडे बाहिणींवर अन्याय होतोय. यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर आता पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेतून पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे आता पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.. आज बीडमध्ये दोन ठिकाणी दरेकरांच्या गाडीचा ताफा अडवण्यात आला. यावेळी मुंडे साहेब अमर है… पंकजाताई अंगार है, बाकी सह भंगार है, अशा घोषणा समर्थक देत होते. काही वेळाने प्रवीण दरेकरांचा ताफा दुसऱ्या रस्त्याने मार्गस्थ झाला.

प्रवीण दरेकरांवर राग का?

महाराष्ट्रात येत्या 20 जून रोजी विधान परिषद निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. विधान परिषदेच्या एकूण दहा सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. याकरिता भाजपने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंना डावलून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील समर्थकांमध्ये अस्वस्थता

विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली असती तर महाराष्ट्रातील राजकारणात त्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्या असत्या. मात्र ही संधी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मराठवाड्यातील सोशल मीडियावरून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ताई नाही तर भाजप नाही, अशा आशयाचे संदेश व्हायरल करत, आपापल्या भागातून कमळ हद्दपार करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांच्या गाडीच्या ताफ्यावर झालेला हल्ला भाजपने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.