
Bharat Gogawale : रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही संपलेला नाहीय रायगड जिल्ह्याचं प्रकरण तर फारच चर्चेत आहे. रायगड जिल्ह्यासाठी स्वातंत्र्यदिनामित्तच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. त्यामुळेच पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत एका प्रकारे तटकरे काहीशा वरचढ ठरल्या आहेत, असं बोललं जातंय. त्यामुळेच मंत्री भरत गोगावले पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पालकमंत्रिपदाचा वाद नव्याने उफळला असतानाच गोगावले यांनी भर सभेत मोठे विधान केले. माझ्या पराभवसाठी महायुतीच्याच काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते, असा आरोप त्यांनी केलाय.
रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यात शिवसेनेकडून निर्धार मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात भरत गोगावले बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्यावरही टीका केली. मी आज मंत्री झालो. हा भरत गोगावले निवडून येऊ नये म्हणून महायुतीच्या काही नेत्यांनीही देव पाण्यात ठेवले होते. मात्र जनतेच्या आशीर्वादानं मी 26 हजार 200 मतांनी निवडून आलो, असे गोगावले म्हणाले. आम्ही गोरगंरीबाचे शेठ आहोत. आम्ही शासनाला लुटणारे नाहीत, असंही ते म्हणाले.
पुढे आपल्या भाषणात गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत सुनिल तटकरे यांना थेट लक्ष्य केलं. मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंनी कधीही कोणत्याही प्रकल्पाला आईचं नाव दिलेलं नाही. सुनील तटकरेंनी सांगितलं मी 10 कोटी देतो पण माझ्या आईचं नाव द्या, अशी टीका गोगावले यांनी केली. काही दिवसांपूर्वी तटकरे यांनी एका भाषणादरम्यान, हातात रुमाल घेत भरत गोगावले यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती. त्याचाही समाचार गोगावले यांनी घेतला. काही लोकांनी आमच्या रूमालाची टिंगल केली. पण आम्ही शून्यातून इकडे आलेलो आहोत, असा हल्लाबोल गोगावले यांनी केला. दरम्यान आता भरत गोगावले यांना पाडण्यासाठी कोण प्रयत्न करत होतं? असा सवाल उपस्थित केला जातोय.