मुंबई महापालिकेत 21 ते 22 कंपन्यांकडून भंगार घोटाळ्याचा भाजपचा आरोप, यशवंत जाधवांचे चौकशीचे आदेश

| Updated on: Oct 27, 2021 | 6:52 PM

भंगार सामानाच्या निविदांसाठी डीलर लोकांचे एक मोठे रॅकेट महापालिकेत गेली 50 वर्ष कार्यरत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. भाजपच्या या आरोपाची दखल घेत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चौकशीचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

मुंबई महापालिकेत 21 ते 22 कंपन्यांकडून भंगार घोटाळ्याचा भाजपचा आरोप, यशवंत जाधवांचे चौकशीचे आदेश
मुंबई महापालिका
Follow us on

मुंबई : महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास आता सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि टीकेचे बाण सोडले जात आहे. मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने, निरुपयोगी आणि भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढल्या जातात. या भंगार सामानाच्या निविदांसाठी डीलर लोकांचे एक मोठे रॅकेट महापालिकेत गेली 50 वर्ष कार्यरत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. भाजपच्या या आरोपाची दखल घेत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चौकशीचे आदेश संबंधितांना दिले आहेत. (BJP alleges scrap scam from 21 to 22 companies in Mumbai Municipal Corporation)

भाजपने केलेल्या आरोपानुसार या रॅकेट मधील डीलर्स पैकी काही डीलर कंपनी एकाच मालकाच्या आहेत. तर काही कंपन्या एकाच पत्त्यावर आहे. या रॅकेटमुळे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. हे रॅकेट नवीन निविदाकाराला आतमध्ये शिरूच देत नाहीत. भंगाराच्या निविदांमध्ये स्पर्धा होऊ देत नाहीत. इतकेच नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून कोट्यवधी रुपयांची लूट करत असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे.

भाजपच्या आक्षेपाचे नेमके मुद्दे काय?

1) A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. ही कंपनी महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या जुन्या भंगार गाड्यांचा लिलाव करते. या कंपनीचे संचालक (मालक) अब्दुल हसन अली खान आणि इमरान अब्दुल हसन अली खान आहेत. त्यांचा नोंदणीकृत पत्ता शॉप नं. 20, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई 400 072 असा आहे.

2) महापालिकेच्या जुन्या भंगार गाड्यांच्या लिलावात सहभागी होणारे दोन मोठे डीलर्स मेसर्स गरीब नवाज कॉर्पोरेशन व मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस (M/s. Akhtar Enterprises) आहेत.

3) महापालिकेच्या लिलावात सहभागी होणारी एक डीलर कंपनी मेसर्स गरीब नवाज कॉर्पोरेशन यांचाही पत्ता शॉप नं. 20, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई 400 072 असा आहे. या कंपनीचा मालक अब्दुल हसन अली खान हाच आहे.

4) महापालिकेच्या लिलावात सहभागी होणारा आणखी एक डीलर कंपनी मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस (M/s. Akhtar Enterprises) यांचाही पत्ता शॉप नं. 20/बी, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई 400 072 असा आहे. आणि त्यांचे मालक अख्तर हसन अली खान आहेत. अब्दुल व अख्तर हे एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ आहेत.

5) मेसर्स A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. महापालिकेच्या जुन्या व भंगार गाड्यांच्या लिलावाची किंमत ठरवितात आणि लिलावाचे आयोजन करतात. आणि या लिलावात सहभागी आणि पात्र होतात गरीब नवाज कार्पोरेशन आणि मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस. म्हणजेच महापालिकेच्या वतीने लिलाव करणारा आणि लिलावात सहभागी होणारा लाभार्थी या दोघांचाही पत्ता सारखाच आणि मालकही सारखेच आहेत.

6) मेसर्स तवाब हुसैन स्क्रॅप ट्रेडर्स (M/s Tawab Hussain Scrap Traders), मेट्रो इंटरप्रायजेस (Metro Enterprises), नशिबदार मुसाहीब अॅन्ड कंपनी (Nasibdar Musahib & Co.) या तीनही वेगवेगळ्या स्क्रॅप डीलर कंपनीचा पत्ता मात्र एकाच ठिकाणी म्हणजे गाळा क्र. 310 छत्रपती शिवाजी कुटीर मंडळ, अनिस कंपाउंड, कोहिनूर सोसायटी, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प), मुंबई – 400 070 असा आहे. आश्चर्य म्हणजे या तीनही कंपन्या आपापसात कंत्राट निविदेत स्पर्धा करतात आणि कंत्राट गिळंकृत करतात.

7) सोबत महापालिकेत भंगार सामानाच्या लिलावात भाग घेणाऱ्या विविध भंगार डीलर्सची यादी जोडीत आहे. हि यादी पाहता आपणांस बहुतांश डीलर्स साकीनाका परिसरातील एकाच ठिकाणी व इतर साकीनाका – कुर्ला एल.बी.एस. मार्ग – कुर्ला बस डेपो परिसराच्या जवळपास असल्याचे लक्षात येते. यापैकी एकाच मालकाच्या दोन ते तीन कंपन्या असून त्या स्पर्धात्मक लिलावात सहभागी होतात.

कारवाईची भाजपची मागणी, शिवसेनेचे चौकशीचे आदेश

A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. या भंगार गाडी लिलाव करण्याऱ्या कंपनीची व या लिलावात भाग घेणाऱ्या 21 कंपन्यांची दक्षता विभागातर्फे चौकशी करावी. लेखा परीक्षण विभागातर्फे लेखा परीक्षण करून आवश्यकता वाटल्यास महापालिकेचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी खटला भरावा अशी मागणी भाजपनं केली आहे. त्यावर या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

इतर बातम्या :

आर्यन खानची आजची रात्रही कारागृहातच! जामीनाबाबत उद्याच्या सुनावणीत निर्णय होणार?

इतिहास काढला तर लक्षात येईल ‘हमाम मे सब नंगे’, जितेंद्र आव्हाडांचा क्रांती रेडकरला सांभाळून बोलण्याचा सल्ला

BJP alleges scrap scam from 21 to 22 companies in Mumbai Municipal Corporation