आधीच रोहित पवार, त्यात माजी नगराध्यक्षही बंडासाठी तयार, राम शिंदेंची धाकधूक वाढली

| Updated on: Sep 06, 2019 | 1:17 PM

रोहित पवार यांनी शड्डू ठोकलेले असतानाच भाजप मंत्री राम शिंदे यांच्यासमोर नामदेव राऊत यांच्या संभाव्य बंडखोरीने आणखी एक आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगरमधील कर्जत जामखेड विधानसभेची निवडणूक तिरंगी होणार आहे

आधीच रोहित पवार, त्यात माजी नगराध्यक्षही बंडासाठी तयार, राम शिंदेंची धाकधूक वाढली
Follow us on

अहमदनगर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पळवापळवी सुरु असताना तिकीट न मिळाल्याने बंडखोरीलाही उधाण येण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि अहमदनगरचे (Ahmednagar) पालकमंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना बंडाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत (Namdev Raut) यांनीच पालकमंत्र्यांविरोधात बंडाचं निशाण फडकावलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. आधीच शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांचं संभाव्य आव्हान समोर राम शिंदेंसमोर आहे. त्यातच भाजपच्या गोटातील माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक (Karjat Jamkhed Vidhansabha Election) लढण्याची शक्यता आहे.

नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचाच्या वतीने त्यांनी 9 तारखेला संकल्प मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात राऊत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र कर्जत-जामखेड मतदारसंघात आतापासूनच मोठमोठे होर्डिंग्ज लागले आहेत. त्यामुळे नामदेव राऊत यांची बंडखोरी जवळपास निश्चित मानली जात आहे.

राम शिंदे निवडूनच येणार नाही, तर त्यांना मंत्री कसं करणार? : जयंत पाटील

कर्जत-जामखेड नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान नामदेव राऊत यांना मिळाला होता. त्यामुळे राऊत यांचं राजकीय वजनही जास्त मानलं जातं.

शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांना पराभूत करुन विजय मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. राम शिंदे यांची आपला मतदारसंघ टिकवताना चांगलीच दमछाक होऊ शकते.

राम शिंदेंविरोधात विजय माझाच : रोहित पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अहमदनगरमध्ये महा जनादेश यात्रेत बोलताना राम शिंदे यांना पुन्हा मंत्री करण्याची घोषणा केली होती. राम शिंदे यांना जेवढी जास्त मतं मिळतील, तेवढं मोठं मंत्रिपद देऊ, असंही म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राम शिंदे निवडूनच येणार नाही, तर त्यांना मंत्री कसं करणार? असा प्रश्न करत आव्हान दिलं होतं.