माझी सुरक्षा काढून घ्या… जनतेतून निवडून आलो, जनतेची भीती कशाला? ‘या’ भाजप आमदाराची मागणी काय?

| Updated on: Nov 01, 2022 | 12:33 PM

...मग तर सरपंचही पोलीस संरक्षण मागतील, आमदाराचा तर्क!

माझी सुरक्षा काढून घ्या... जनतेतून निवडून आलो, जनतेची भीती कशाला? या भाजप आमदाराची मागणी काय?
Follow us on

निनाद करमरकर, बदलापूरः आम्ही जनतेतूनच निवडून आलो आहोत, मग जनतेची भीती कशाला, असा सवाल भाजप आमदाराने (BJP MLA) केला आहे. एवढच नाही तर या आमदाराने गृहविभागाला (Home ministry ) एक पत्र पाठवलंय. त्यात स्वतःची सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्याची मागणी केली आहे. राज्यातील सगळ्याच लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं अनावश्यक पोलीस संरक्षण काढून घ्यावं, अशी मागणी भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी केली आहे.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला एक पोलीस उपनिरीक्षक आणि पाच पोलीस कर्मचारी, असं संरक्षण देण्यात आलं आहे. दोन शिफ्टमध्ये देण्यात येणाऱ्या या संरक्षणासाठी प्रत्येक आमदारामागे 12 पोलीस कर्मचारी अनावश्यकरीत्या व्यस्त झाले आहेत.

त्यामुळे पोलीस दलावर मात्र आधीच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असताना अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं अनावश्यक पोलीस संरक्षण काढून घ्यावं, अशी मागणी भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केली आहे.
तसंच ही मागणी फक्त आमदार किंवा खासदार यांच्याच बाबतीत नव्हे, तर ज्यांना ज्यांना आवश्यकता नसताना पोलीस संरक्षण दिलं आहे, त्या सर्वांचंच पोलीस संरक्षण काढून घ्यावं अशी ही मागणी असल्यासही किसन कथोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

जे जनतेतून निवडून येतात त्यांना जनतेत वावरताना जनतेचीच भीती कशाला? असा सवाल करत माझं सुद्धा पोलीस संरक्षण सरकारने काढून घ्यावं, अशी विनंती त्यांनी केली आहे. सोबतच उद्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सगळे सरपंचही पोलीस संरक्षण मागतील, त्यांना सुद्धा सरकार संरक्षण देत बसलं, तर गृह विभागावर किती भार पडेल? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
राज्यातील महाविकास आघाडीतील काही आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. तर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे नेते शिंदे सरकारवर टीका करत आहेत. यावरून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी ही मागणी केली आहे.