राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवलं, कोण आहेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर?

| Updated on: Aug 31, 2021 | 7:58 AM

MP Ranjit Singh Naik Nimbalkar | भाजपने मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासारख्या तगड्या नेत्याला उमेदवारी देण्यात आली. रणजितसिंह यांनीही विजय मिळवत आपली निवड सार्थ ठरवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना पराभवाची धूळ चारत माढ्यात कमळ फुलवले होते.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवलं, कोण आहेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर?
रणजितसिंह नाईक निंबाळकर
Follow us on

मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी माघार घेतली. परंतु, पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या माढ्यातील लढत भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे भाजपने मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासारख्या तगड्या नेत्याला उमेदवारी देण्यात आली. रणजितसिंह यांनीही विजय मिळवत आपली निवड सार्थ ठरवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना पराभवाची धूळ चारत माढ्यात कमळ फुलवले होते.

कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1977 रोजी पुण्यात झाला. रणजित हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र असून फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. रणजितसिंह व त्यांचे वडील हिंदुराव हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा राजकीय प्रवास

रणजितसिंह व त्यांचे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर हे अगदी 2019 पर्यंत काँग्रेमध्ये होते. हे दोघेही काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी एक होते. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी रणजितसिंह आणि हिंदुराव नाईक- निंबाळकर यांचे चांगले संबंध होते. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले होते. तसेच त्यांनी साताऱ्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही भुषविले होते.

माढा लोकसभा मतदारसंघात स्वराज दूध संघ आणि हिंदुराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावात त्यांचं नेटवर्क उभं आहे. तसेच फलटण पंचायत समिती आणि सातारा जिल्हापरिषदेतही रणजितसिंह नाईक-निंबाळकर वर्चस्व राखून आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर काँग्रेसने त्यांना माढ्यातून उमेदवारी द्यावी, यासाठी आग्रही होते. मात्र, जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडूनही त्यांना तात्काळ लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असतानाही या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा दारूण पराभव केला होता.

संबंधित बातम्या:

बारामतीचं पाणी माढ्यातील दुष्काळी भागाला वळवणार : रणजितसिंह नाईक

रामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय : रणजितसिंह

चिल्लर जमा करुन रुपया होत नाही, खासदार निंबाळकरांचं शरद पवारांच्या बैठकीवर टीकास्त्र