काँग्रेसची विनंती मान्य, भाजपचा मोठा निर्णय, शब्द आणि परंपरा पाळणार, राज्यसभा पोटनिवडणुकीतून माघार

| Updated on: Sep 27, 2021 | 4:55 PM

महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. कारण भाजपने आता परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून, आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

काँग्रेसची विनंती मान्य, भाजपचा मोठा निर्णय, शब्द आणि परंपरा पाळणार, राज्यसभा पोटनिवडणुकीतून माघार
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. कारण भाजपने आता परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून, आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे आज आपला अर्ज मागे घेत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नुकतंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आता काँग्रेसची विनंती भाजपने मान्य केली.

काँग्रेस नेत्यांनी फडणवीसांची घेतली होती भेट

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 23 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होत असलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली. भाजपनेही काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. दुपारी 1 वाजात ते उमेदवारी माघारी घेणार आहेत.

काँग्रेसने रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. रजनी पाटील यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज भाजपनं मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित होते.

6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी झाली होती. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर होती. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.

मित्राने मित्राचा शब्द पाळला!

महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली होती. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं होतं. आज अखेर चार दिवसांनंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भाजपने जाहीर करुन काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.

कोण आहेत रजनी पाटील?

रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या 12 नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.

संबंधित बातम्या  

पटोले-थोरातांना फडणवीसांवर विश्वास, म्हणाले, आमचा मान ठेवतील, शब्द मोडणार नाहीत!