भाजपची दुसरी जम्बो मेगाभरती, तब्बल 50 आमदारांच्या प्रवेशाची तारीख ठरली?

| Updated on: Aug 01, 2019 | 10:38 AM

जुलैला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी प्रवेश केल्यानंतर येत्या 10 ऑगस्टला भाजपमध्ये दुसरी मेगाभरती (BJP Mega Bharti) होणार आहे.

भाजपची दुसरी जम्बो मेगाभरती, तब्बल 50 आमदारांच्या प्रवेशाची तारीख ठरली?
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मेगाभरती (BJP Mega Bharti) सुरु केली आहे. काल अर्थात बुधवारी 31 जुलैला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी प्रवेश केल्यानंतर येत्या 10 ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये दुसरी मेगाभरती (BJP Mega Bharti) होणार आहे. या मेगाभरतीदरम्यान थोडेथोडके नव्हे तर जवळपास 50 आमदारांचे प्रवेश भाजपमध्ये होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

भाजपने आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. या महाजनादेश यात्रेत विविध पक्षातील आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही यात्रा जसजशी जिल्ह्याजिल्ह्यात जाईल, तसतसे त्या त्या जिल्ह्यातील आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे. मात्र स्थानिक पातळीवर गटबाजी उफाळून येण्याच्या भीतीने भाजपने ही मेगाभरती 10 ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने निश्चित केल्याचीही माहिती मिळत आहे. तब्बल 50 आमदार भाजपमध्ये येणार असल्याने आधीच भगदाड पडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची धाकधूक नक्कीच वाढली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले होते. त्यापैकी अनेकांनी आतापर्यंत शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये आणखी काहींची भर पडणार आहे.

भाजपची महाजनादेश यात्रा

भाजपच्या महाजनादेश यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आजपासून अमरावतीतील गुरूकुंज मोझरी येथून सुरुवात होत आहे. भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाजनादेश यात्रेच्या सुरुवातील राज्यातील भाजपचे सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. ही यात्रा 34 जिल्हे आणि 151 मतदारसंघातून प्रवास करणार आहे.

भाजपमध्ये काल प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे

  1. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड
  2. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड
  3. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले
  4. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक
  5. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर
  6. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ
  7. नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक
  8. महात्मा फुले यांच्या वंशज नीता हुले
  9. माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील

संबंधित बातम्या  

उद्घाटनाला अमित शाह, समारोपाला मोदी, फडणवीसांची महाजनादेश यात्रा

आधी सुजयला पकडलं, राधाकृष्ण सापडले, वैभवला पकडलं मधुकर पिचड मिळाले, मुख्यमंत्र्यांनी रणनीती सांगितली!   

मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!   

शरद पवार बाजूला बसलेले, आमदार फोडाफोडीवर मुख्यमंत्री म्हणतात….