शेवटी पैलवानानं ठाकरेंची साथ सोडली, चंद्रहार पाटलांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश!

चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांत त्यांच्या या पक्षप्रवेशाची चर्चा होती.

शेवटी पैलवानानं ठाकरेंची साथ सोडली, चंद्रहार पाटलांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश!
chandrahar patil
| Updated on: Jun 09, 2025 | 9:48 PM

Chandrahar Patil Joins Eknath Shinde Shiv Sena : गेल्या अनेक दिवसांपासून सांगलीतील उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश सोहळा फक्त एक औपचारिकता म्हणून राहिला होता. शेवटी आता चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ अधिकृतरित्या सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी मी पक्षवाढीसाठी काम करणार आहे, असे सांगितले.

चंद्रहार पाटील नेमकं काय म्हणाले?

पक्षप्रवेश झाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. माझ्या पक्षप्रवेशासाठी ज्यांनी अट्टहासाने प्रयत्न केले. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, अशी राम रेपाळे, शरद कणसे काका यांची इच्छा होती. त्यांचे मी आभार मानतो, अशा भावना चंद्रहार पाटलांनी यावेळी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी इतरही बडे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

सांगलीची माणसं चांगली असतात. चंद्रहार पाटील आज आपल्या पक्षात आले. मी तुमची अगोदरची जागा चुकली असं म्हणणार नाही. पण शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट केली, असं तुम्ही सांगितलं. मीदेखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मी मुख्यमंत्री झाल्याचे अनेकांना पचनी पडलेलं नाही. सांगलीचा ढाण्या वाघ आता खऱ्या जंगलात आला आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

जोम काम करेल तो पुढे जाईल

तसेच, वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले, त्यांना आता त्या कृतीची प्रचिती आली आहे. माझ्या पक्षात कोणीही नोकर नाही, मालक नाही. जो काम करेल तो पुढे जाईलत, असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काम करत राहण्याचीही सूचना केली.

चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी लावली होती ताकत

दरम्यान, 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना सांगली या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती. शेवटपर्यंत दोन्ही पक्षांनी ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. शिवसेना माघार घेण्यास तयार नसल्याचे समजल्यानंतर शेवटी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ही जागा ठाकरेंना दिली होती. ही जागा जिंकण्यासाठी ठाकरेंनी चांगलीच ताकद लावली होती. मात्र चंद्रहार पाटलांना फक्त 55 हजार मतं मिळाली होती.