…तरच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल : चंद्रकांत पाटील

| Updated on: Feb 05, 2020 | 2:37 PM

मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात 17 मार्चला अंतिम सुनावणी आहे, तेव्हा तरी राज्य सरकारने नीट तयारी करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला. 

...तरच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल : चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी व्यवस्थित तयारी केली नाही. आम्ही उच्च न्यायालयासाठी व्यवस्थित तयारी केली होती. नीट तयारी करुन केस चालवली, तर मराठा समाजाला कायमचे आरक्षण मिळेल, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Maratha Reservation) यांनी व्यक्त केलं.

मागास आयोगाची निर्मिती न झाल्याने आम्ही मागास आयोगाची निर्मिती केली. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार इतिहासात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध झालं. त्यानुसार नोकऱ्या, वैद्यकीय जागांवर आरक्षण दिले गेले. त्यावर सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यास नकार देण्यात आला. अंतिम सुनावणी 17 मार्चला आहे, तेव्हा तरी तयारी करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला.

सरकारमध्ये असणाऱ्या काही जणांचा मराठा आरक्षणाला तात्विक विरोध आहे. त्यांनी वेळप्रसंगी विरोधकांना सामील करुन घ्यावे. त्यासाठी शासनाने ठाम भूमिका घ्यावी, असंही चंद्रकांत पाटलांनी सुचवलं. यामध्ये राजकारण न करण्याची विनंतीही पाटलांनी केली.

हेही वाचा :  मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

‘सुधारित नागरिकत्व कायदा म्हणजेच ‘सीएए’मुळे कुणाचं नुकसान होत नाही, या मताशी आपण सहमत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितलं. ‘हे साप म्हणून भुई बडवण्यासारखे आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते आमच्याशी सहमत झाले असतील, तर त्यांनी राज्यात कायदा अस्तित्वात आणावा. त्याविरोधात सुरु असणारी आंदोलनं थांबवणार का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. ‘सामना’मध्ये तसं जाहीर छापून आलं आहे, त्यांनी ‘मला तसं म्हणायचं नव्हतं’ म्हटलं नाही म्हणजे झालं, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

या सरकारने एकजुटीने काम केलं पाहिजे आणि जिथे जिथे आवश्यक आहे, तिथे विरोधी पक्षाला सोबत घेतले पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वपासून दूर करत आहे. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. शिवसेनेमुळे मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. मात्र आता मनसेला जागा करुन दिली जात आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून मनसे आणि भाजप ही नावं समोर येतात, याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. हा पद्धतशीर आखलेला डाव आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली, त्याला आमचा पाठिंबा असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळावं, यासाठी आम्ही पाठपुरावा करु, अशी हमी चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र सावरकरांवर हीन शब्दात टीका झाली, त्यावेळी शिवसेना गप्प का होती? असा सवालही त्यांनी विचारला. तर उद्धव ठाकरेंविषयी आशिष शेलारांनी टीका केली, तेव्हा आम्ही त्यांना माफी मागायला लावली, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.

Chandrakant Patil on Maratha Reservation