भ्रष्टाचारामुळे भुजबळ जेलमध्ये, आगे आगे देखो होता है क्या : मुख्यमंत्री

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत विरोधकांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर तुफान टीका केली. राज ठाकरेंना नाशिकच्या जनतेने महापालिकेची सत्ता दिली. मात्र त्यांनी काहीही कामं केली नाही. कुंभमेळ्या दरम्यान युती सरकारने नाशिकमध्ये कामं केली. राज ठाकरे केवळ फुकटचं श्रेय लाटत आहेत, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. पहिल्या […]

भ्रष्टाचारामुळे भुजबळ जेलमध्ये, आगे आगे देखो होता है क्या : मुख्यमंत्री
Follow us on

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत विरोधकांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर तुफान टीका केली. राज ठाकरेंना नाशिकच्या जनतेने महापालिकेची सत्ता दिली. मात्र त्यांनी काहीही कामं केली नाही. कुंभमेळ्या दरम्यान युती सरकारने नाशिकमध्ये कामं केली. राज ठाकरे केवळ फुकटचं श्रेय लाटत आहेत, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.

पहिल्या तीन टप्प्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. पवारांनी पॅड घातलं, ग्लोव्ह्ज घातले पण मोदींची गुगली पाहून पॅव्हिलियनमध्ये निघून गेले. त्यांना निवडणुकीत भाड्याने वक्ते आणावे लागतं आहेत. पवार साहेबांनी रेल्वेचं इंजिन भाड्याने घेतलं. पण तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नाही, ते गल्लीत बंद पडलं आहे. इंजिनला मोदींनी पछाडलं आहे.  राज साहेब तुमचं दुकान नोटबंदीने  बंद झालं. आमची कुठेही शाखा नाही अशी यांची परिस्थिती झाली आहे.  नाशिकच्या जनतेनं तुम्हाला घरी पाठवलं. नाशिकच्या विकासाची कामं आमच्या पैशांनी झाली. राज ठाकरे तुम्ही तुमचे नगरसेवक आणले होते आणि म्हणाले होतात, महापालिकेचा हिस्सा सिंहस्थाला देऊ शकत नाही. आमच्या पैशाने शहरात कुंभात विकासाची कामं केली. तुमचं नेमकं कर्तृत्व काय असा आमचा सवाल आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

नाशिकमध्ये दोन हजार कोटींची कामं आम्ही सुरु केली आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शहरात लवकरच इलेक्ट्रिक बस सेवा सुरु करतो आहोत. पब्लिक ट्रान्स्पोर्टचा नवीन प्रयोग आणतो आहे. नाशिकला महाराष्ट्रातलं अद्ययावत शहर करणार. कामं केली म्हणून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. 23 तारखेला यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

भुजबळ नटसम्राट

छगन भुजबळांसारखा नटसम्राट महाराष्ट्राने पाहिलेला नाही. भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं. आगे आगे देखिये होता है क्या. सध्या बेलवर आहेत,  आता तर केस चालणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘रॉकेटला बांधून पाठवा

“बालाकोट हल्ल्याबाबत जगाने मान्य केलं, अमेरिका, रशिया, चीनने विश्वास ठेवला. मात्र दोघांनाच त्याबाबत अविश्वास होता. एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरा म्हणजे महाखिचडी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आता त्यांच्यासोबत प्रश्न विचारणारे राज ठाकरे होते.

राज ठाकरे बालकोट हल्ल्याचे पुरावे मागतायेत. मी गमतीने म्हटलं, तुम्ही आधी सांगितलं असतं, तुम्ही पुरावे मागणार आहात, तर बालाकोटमध्ये जे रॉकेट पाठवलं, त्यासोबत तुमच्या नेत्याला बांधून पाठवलं असतं आणि सांगितलं असतं जा आणि आमच्या सेनेचं शौर्य पाहा”, असं मुख्यमंत्री म्हणाले.