भाजपातील मुख्यमंत्रीपदाचे सर्व स्पर्धक बाद

| Updated on: Oct 24, 2019 | 6:55 PM

देवेंद्र फडणवीस हे एकमेव नाव मुख्यमंत्रीपदासाठी निर्विवादपणे कायम राहिलं आहे. या चार नेत्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपातील मुख्यमंत्रीपदाचे सर्व स्पर्धक बाद
Follow us on

मुंबई : 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. यानंतर एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी (Maharashtra next CM) चर्चेत होती. पण कालांतराने या नेत्यांची नावं नाहीशी झाल्याचं चित्र आहे. कारण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून कन्येला संधी देण्यात आली, पण पराभव झाला. विनोद तावडेंना तिकीटही देण्यात आलं नाही, तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे एकमेव नाव मुख्यमंत्रीपदासाठी (Maharashtra next CM) निर्विवादपणे कायम राहिलं आहे. या चार नेत्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर राज्यात नेतृत्त्वासाठी 2014 ला अनेक नेत्यांची नावे पुढे आली. अखेर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबतचे घनिष्ट संबंध आणि राजकीय कसब याच्या बळावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नवी समीकरणे उदयास आणली. पूर्ण बहुमत नसतानाही त्यांनी स्थिर सरकार दिलं आणि केंद्रीय नेतृत्त्वाचं मन जिंकलं.

मुख्यमंत्र्यांचे स्पर्धक म्हणून विनोद तावडे यांच्याकडेही पाहिलं जात होतं. विनोद तावडेंकडे शिक्षण विभाग देण्यात आला होता. फडणवीसांच्या कार्यकाळातील अखेरच्या फेरबदलात हा विभागही त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी कोणतंही कारण न देता विनोद तावडेंचा पत्ता कट करण्यात आला. यावर नाराजी व्यक्त करत याचा जाब केंद्रीय नेतृत्त्वाला विचारणार असल्याचं तावडे म्हणाले होते.

एकनाथ खडसे यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. अनेक वर्षे विरोधी पक्षात काम केल्यानंतर सत्ता आली, मात्र खडसेंना फार काळ मंत्रीपदी राहता आलं नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आणि त्यांनी विनाविलंब राजीनामा दिला. पण यानंतर त्यांचा राजकीय वनवास सुरु झाला, जो अजूनही सुरु आहे.

या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना तिकीट न देता त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं. पण मित्रपक्ष शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केली आणि खडसेंच्या मुलीचा मार्ग बिकट बनला. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केल्यामुळे या लढतीत आणखी रंगत आली. अखेर रोहिणी खडसे यांचा पराभव झाला.

पंकजा मुंडे यांनाही परळीत पराभवाचा सामना करावा लागला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढत झंझावात उभा केला. बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच जागा त्यांनी जिंकल्या आणि राज्यभर प्रचारही केला. यानंतर पंकजा मुंडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेण्यात आलं. पण या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पंकजा मुंडे आपोआप या स्पर्धेतून बाद झाल्या आहेत.