‘राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’… एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य, चर्चांना उधाण

| Updated on: Dec 07, 2022 | 9:11 AM

सोशल मीडियावर नेटकरी एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतायत. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यावर काय स्पष्टीकरण देतायत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य, चर्चांना उधाण
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आपण राज्याचे मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister)आहोत, हेच कदाचित एकनाथ शिंदे विसरले असावेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. एका भाषणात सुरुवातीला उल्लेख करताना एकनाथ शिंदे यांनी ‘ राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी.. (Devendra Fadanvis) असा उल्लेख केला. शिंदे यांच्या या वक्तव्याने विविध चर्चांना उधाण आलंय.

गोरेगाव येथील कोकण महोत्सवादरम्यान एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पाहत नसून ते उपमुख्यमंत्री आहेत अन् देवेंद्र फडणीवस हे मुख्यमंत्री आहेत, असे टोमणे वारंवार विरोधकांकडून लगावले जातात. राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवण्यात आलं.

भाजप श्रेष्ठींच्या या निर्णयानं राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकही चक्रावून गेले होते. स्वतः देवेंद्र फडणवीसदेखील नाराज दिसून येत होते. मात्र शिंदे-भाजप युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिमंदे यांची वर्णी लागली.

शिंदेंच्या आमदारांच्या गटाने भाजपशी युती केली असल्याने राज्यातील सर्व निर्णय भाजपच्याच मतानुसार होतात, एकनाथ शिंदे फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केली जाते.

आता तर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच हे वक्तव्य केल्याने आता विरोधकांच्या हातात आयतं कोलित सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ राजकीय वर्तुळात वेगाने व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर नेटकरी एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतायत. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यावर काय स्पष्टीकरण देतायत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.