
सोमवारी (९ जून) कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा स्थानकाजवळ सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर आता लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढलेल्या गर्दीमुळे अशी घटना घडल्याचे समोर आले आहे. अशातच आता वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
कालची घटना गंभीर – मुख्यमंत्री
आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांना मुंब्रा येथे झालेल्या अपघाताबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना फडणवीसांनी सांगितले की, कालची घटना गंभीर आहे. मेट्रोचा विस्तार कमी असल्यामुळे लोकलमधील गर्दी जास्त आहे. लोकलला दरवाजे लावले तर व्हेंटीलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारला माहिती आहे. त्यामुळे भाडं न वाढवता एसी ट्रेन देण्याविषयी केंद्र सरकार विचार करत आहे.
सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल- फडणवीस
पुढे बोलताना फडणवीसांनी सांगितले की, ‘आगामी काळात कालसारखी घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळत बदल करण्यात आला आहे. मात्र खाजगी कार्यालयांमध्ये ते करणं थोडं कठीण आहे. कारण यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर परिणाम होतो. मात्र आगामी काळात याबाबत निर्णय होऊ शकतो.’
४ जण ठार, १३ जण जखमी
मुंब्रा लोकल अपघातात १३ जण जखमी झाले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी कळवा छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे सिविल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातात जखमी असलेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.
पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा अपघात कसा झाला? यासाठी पोलिसाचा तपास सुरु आहे. लवकरच त्या लोकल ट्रेनमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचा जबाब घेणार असल्याची पोलीस सूत्रांनी सांगितले. तसेच दोन रेल्वे रुळांमधील आंतर मोजण्यात येणार आहे.