हार्दिक पटेल 25 दिवसांपासून बेपत्ता, पत्नीची तक्रार

| Updated on: Feb 11, 2020 | 10:05 AM

गुजरात काँग्रेसचे नेते आणि पाटीदार आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे हार्दिक पटेल हे गेल्या 18 जानेवारीपासून बेपत्ता आहेत, असा दावा त्यांच्या पत्नी किंजल यांनी केला आहे.

हार्दिक पटेल 25 दिवसांपासून बेपत्ता, पत्नीची तक्रार
Follow us on

गांधीनगर : गुजरात काँग्रेसचे नेते आणि पाटीदार आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे हार्दिक पटेल 18 जानेवारीपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांची पत्नी किंजल यांनी केला आहे (Hardik Patel Missing). हार्दिक पटेल यांना 18 जानेवारीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं होतं, तेव्हापासून ते घरी परतलेले नाहीत.

सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यामुळे 18 जानेवारीला पटेल यांना अटक करण्यात आली होती.

हार्दिक पटेल यांना अटक केल्यानंतर चार दिवसांनी त्यांना जामीन देण्यात आला. मात्र, पाटण आणि गांधीनगर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यासंबंधी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर 24 जानेवारीला त्यांना जामीन मिळाला. मात्र, सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला. हार्दिक पटेल यांच्यावर 2015 च्या पाटीदार आरक्षण आंदोलनासंबंधित देशद्रोहाचा खटला सुरु आहे.

हार्दिक पटेल यांचा अंतरिम जामीन अर्ज एका दुसऱ्या न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे जर ते इथे हजर राहिले तर त्यांना अटक होऊ शकते. म्हणून सुनावणीदरम्यान हजर राहू शकले नाही, असं हार्दिक पटेल यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितलं. मात्र, त्यांचा हा युक्तीवाद न्यायालयाने फेटाळून लावला होता.

हार्दिक पटेलांविरोधात 20 हून अधिक खटले सुरु आहेत. यापैकी दोन देशद्रोहाशी निगडीत आहेत. 2015 मध्ये त्यांनी पाटीदार आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व केल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पाटीदार आरक्षणच्या नेत्यांकडून आयोजित एका कार्यक्रमात किंजल पटेल यांनी हार्दिक पटेल बेपत्ता असल्याची माहिती दिली. हार्दिक पटेल यांना 18 जानेवारीला अटक केल्यानंतर त्यांचा अद्याप संपर्क नाही. ते गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहेत.  आम्हाला माहीत नाही ते कुठे आहेत. मात्र, पोलीस वारंवार येऊन आम्हाला ते कुठे आहेत अशी विचारणा करत आहेत, असं किंजल यांनी सांगितलं आहे. (Hardik Patel Missing)