काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार?

| Updated on: Jul 22, 2019 | 9:20 AM

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला लागलेली गळती अजूनही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. पक्षाच्या आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत असताना आता पक्षाचे पदाधिकारीही भाजपच्या मार्गावर आहेत.

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार?
Follow us on

सांगली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला लागलेली गळती अजूनही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. पक्षाच्या आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत असताना आता पक्षाचे पदाधिकारीही भाजपच्या मार्गावर आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगलीचे काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरु आहेत.

सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सत्यजित देशमुख यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांना भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून लढवले जाऊ शकते. शिराळातील विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांना विधानपरिषद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

काँग्रेसशी एकनिष्ठ, सक्षम नेतृत्व, जनाधार असलेले नेते असूनही काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे आपल्या कारकिर्दीला फटका बसत असल्याची खंत, काही दिवसांपूर्वी सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, भाजपने मागील काळात काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते ठाण मांडून होते. अगदी बारामतीत सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री चंद्रकांत पाटील संपूर्ण निवडणूकीत बारामतीत थांबले होते.

कोण आहेत सत्यजीत देशमुख?

  • सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत
  • सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवलं होतं.
  • सांगली जिल्ह्यात देशमुख कुटुंबाला मानणारा गट आहे.

संबंधित बातम्या 

भाजपच्या संपर्कात आहात का? विश्वजीत कदम, सत्यजीत देशमुख म्हणतात