चालू करा रे तो स्क्रीन… मुख्यमंत्र्यांची ‘राज’स्टाईल भाषणबाजी

| Updated on: Aug 04, 2019 | 6:00 PM

लोकसभा निवडणुकांच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाजलेल्या 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलची काहीशी आठवण झाली, ती गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा. याचं कारण म्हणजे 'चालू करा रे तो स्क्रीन...' असं म्हणत फडणवीसांनी भाषण सुरु केलं

चालू करा रे तो स्क्रीन... मुख्यमंत्र्यांची राजस्टाईल भाषणबाजी
Follow us on

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गडचिरोलीमध्ये पोहचली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली, तेव्हा लोकसभा निवडणुकांच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाजलेल्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलची काहीशी आठवण झाली. याचं कारण म्हणजे ‘चालू करा रे तो स्क्रीन…’ असं म्हणत फडणवीसांनी केलेली सुरुवात.

गडचिरोलीमधील वडसामध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. भाषण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस उभे राहिले. भाषणाला सुरुवात करताच मंडपात लागलेल्या LED स्क्रीनवर फडणवीस यांचे भाषण दिसेना… त्यामुळे उपस्थितांमध्ये काहीशी चलबिचल झाली.

फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली खरी, मात्र तरीही त्यांचा चेहरा स्क्रीनवर दिसत नसल्यामुळे गर्दीतून नाराजीचा सूर उमटू लागला. ‘साहेब तुमचे भाषण दिसत नाही’ अशा प्रतिक्रिया व्यक्त हळूहळू उमटायला लागल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘अरे मी इथे दिसतोय ना?’ मात्र प्रेक्षकांमधून नकारार्थी उत्तर आलं. ‘नाही साहेब…’. यावर फडणवीस म्हणाले ‘ऐकू तरी येतंय ना…’ पुन्हा एकदा उपस्थितांमधूनन उत्तर आलं….’नाही….’ मग काय, फडणवीस तंत्रज्ञांना म्हणाले….’अरे चालू करा रे तो स्क्रीन…’

काही मिनिटांत तंत्रज्ञांनी बिघाड दूर करत LED स्क्रीन सुरु केला… मात्र उपस्थितांमध्ये कुजबूज रंगली ती मुख्यमंत्र्यांच्या या अनोख्या स्टाईलची.

राज ठाकरेंची स्टाईल

लोकसभा निवडणुकांच्या वेळी राज ठाकरे यांना भाजपविरोधात प्रचार केला होता. यावेळी भाजप सरकारची पोलखोल करणारे व्हिडिओ जाहीर सभांमध्ये दाखवण्याचा सपाटा मनसेने लावला होता. व्हिडिओ दाखवण्यापूर्वी लॅपटॉप ऑपरेटरला राज ठाकरे ‘लाव रे तो व्हिडिओ’ अशी सूचना देत असत. मनसे अध्यक्षांची ही सूचना परवलीचा शब्द झाली होती. अनेक वेळा तर राज ठाकरेंऐवजी उपस्थित प्रेक्षकही तो आदेश देत.