माझा राजा उपाशी असताना मी घरात कसा बसू, छत्रपतींचा मावळा म्हणून इथं आलो : धैर्यशील माने

| Updated on: Feb 26, 2022 | 9:45 PM

संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairysheel Mane) आंदोलन स्थळी उपस्थित राहिले होते.

माझा राजा उपाशी असताना मी घरात कसा बसू, छत्रपतींचा मावळा म्हणून इथं आलो : धैर्यशील माने
धैर्यशील माने यांनी आझाद मैदानावर उपस्थिती लावली
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई : मराठा (Maratha) समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती आज मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairysheel Mane) आंदोलन स्थळी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी माझा राजा उपाशी असताना घरात कसा बसू, असं म्हटलंय. तर, छत्रपतींच्या वंशजांचं कुटुंब उपाशी आहे हा काळा दिवस असल्याचं देखील ते म्हणाले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात ज्यांनी शौर्य आणि पराक्रमानं महाराष्ट्राचं नाव जगाच्या पाठीवर मिळवलं आणि आपल्याला सन्मान जगण्याची संधी दिली ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आरक्षण ही संकल्पना जगाला सांगितली त्यांचे वंशज आज उपोषणाला बसले आहेत. आज मला विचारलं गेलं कोण म्हणून आलाय. मी सांगू इच्छितो की मी इथे खासदार म्हणून नाही तर छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय. मी संभाजीराजेंचा हा संघर्ष जवळून पाहिलाय. राजेचं ज्यावेळचं मुंबईला आंदोलन झालं त्यावेळी राजे सर्वत्र चालत जात होते. मी त्यावेळी खासदार नव्हतो. त्यावेळी संभाजी छत्रपतींच्या एका शब्दावर मराठा समाज बांधव एकत्र आले आणि महाराष्ट्र शांत राहिला, ही परिस्थिती होती, असं धैर्यशील माने म्हणाले.

माझा राजा उपाशी आणि घरात कसा बसू

राज्य सरकारकडं काही मागण्या अडल्या आहेत. राजेंनी कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन केलं. राज्यात ते गेले. ते केंद्रात मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत असतात. माझा राजा इथे उपाशी बसतो आणि मी घरात बसेन असं होऊ शकणार नाही, त्यामुळं मी इथं आलो. संभाजी छत्रपती यांचं कुटुंब उपाशी आहे. शौर्याची परंपरा देशाला घालून देणारे घराणे आहे. आपल्या आशीर्वादनं मी खासदार झालोय. मी निश्चितपणे आपली ही भूमिका मंत्रिमंडळासमोर घेऊन जाईन, असं खासदार धैर्यशील माने म्हणाले.

राजेंचा एक मावळा म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईन

आज जो संयम त्यांनी दाखवलाय त्याला सलाम करतो. राजानं आंदोलन हातात घेतलं. तलवारीची ख्याती सर्वत्र आहे. शिवछत्रपतींचा वंशज लढाई लोकशाही मार्गानं लढतो याचं आदर्श उदाहरण आहे. तलवारीची ख्याती छत्रपतींची आहे. मात्र, राजे लोकशाही पद्धतीने तुमच्यासाठी लढत आहे. राजांनी आजचा दिवस ओलांडता कामा नये. राजे लाख गेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा राहिला पाहिजे, ही शिवछत्रपतींविषयी महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे. राजेंचा एक मावळा म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत गाऱ्हाणं घेऊन जाईन. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटकडून इनपूट घेण्याचं काम सुरु आहे.

हा काळा दिवस

राजेंच्या कुटुंब आमरण उपोषणाला बसतं हा माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे, असं धैर्यशील माने म्हणाले. ज्यांनी महाराष्ट्राला, देशाला, लाखो शेतकऱ्यांना घडवण्याचा इतिहास केला. त्या शिवछत्रपतींच्या कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतं हे भूषणावह नाही, असं धैर्यशील माने म्हणाले.

इतर बातम्या:

महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

एसटीचा संप राजकारणामुळे विस्कटला, मराठा आरक्षणाच्या उपोषणात राजकारण नको – प्रवीण दरेकर

हेही पाहा