अंतर्गत कलहातून कुरघोड्या, सोलापुरात डर्टी पॉलिटिक्स

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : सध्या एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असं डर्टी पॉलिटिक्स सोलापुरात समोर येत आहे. भाजपचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपल्या पक्षातीलच लोकांनी विषप्रयोग करून आपल्याला संपवण्याचा आरोप करून खळबळ माजवली आहे. सुरेश पाटलांच्या विषप्रयोगाचा विषय पोलीस तपासत असतानाच, काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काँग्रेस पक्षातीलच काही लोकांकडून आपल्याला आणि […]

अंतर्गत कलहातून कुरघोड्या, सोलापुरात डर्टी पॉलिटिक्स
Follow us on

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : सध्या एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असं डर्टी पॉलिटिक्स सोलापुरात समोर येत आहे. भाजपचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपल्या पक्षातीलच लोकांनी विषप्रयोग करून आपल्याला संपवण्याचा आरोप करून खळबळ माजवली आहे. सुरेश पाटलांच्या विषप्रयोगाचा विषय पोलीस तपासत असतानाच, काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काँग्रेस पक्षातीलच काही लोकांकडून आपल्याला आणि भावजीला संपवण्याचा कट केला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसमध्येही सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आणलंय.

सुरेश पाटील… सोलापूर महापालिकेतील भाजपचा बुलंद आवाज. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असतानाही भाजपकडून स्वतःच्या प्रभागातून हमखास निवडून येणारे सुरेश पाटील. केंद्रात आणि राज्यात जशी भाजपची सत्ता आली तशी सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर जेष्ठ म्हणून सुरेश पाटील यांना सभागृह नेत्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र महानगरपालिकेत असलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख असे दोन गटात नगरसेवकांचे विभाजन झालंय. विरोधकांपेक्षा अंतर्गत दोन्ही गटात कुरघोड्या सुरूच आहेत. दोन्ही गटातील वाद प्रदेश पातळीवर गेला तरीही तिढा मात्र सुटला नाही.

त्यातच विजयकुमार देशमुख गटाचे सुरेश पाटील यांना सप्टेंबर 2017 मध्ये अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना सोलापूर, पुणे आणि मुंबई येथे उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या शरीरात थेलियम नावाचे विष आढळल्याने त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. उपचारा नंतर सुरेश पाटील जेव्हा घरी आले, त्यावेळी सभागृह नेते स्वीकृत नगरसेवक आणि उपमहापौर निवडीच्या कारणावरून स्वतःच्या पक्षातील महापौर शोभा बनशेट्टीसह पाच जणांनी आपल्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप त्यांनी केला.

सुरेश पाटील यांच्या तक्रारीनुसार सध्या शहर पोलीस सुरेश पाटील विषबाधा प्रकरणात अनेकांचे जबाब घेत आहेत. तर इकडे सुरेश पाटील यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं सांगितलं जातंय.

या प्रकणानंतर भाजपचे अंतर्गत कलह वेशीवर आल्याचं भाजप नेतृत्त्व नाकारु शकत नाही. या प्रकरणानंतर काँग्रेस समर्थकांनी भाजपला ट्रोल करून हैराण केलं. आता काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काँग्रेसच्या काही लोकांनी त्यांना आणि त्यांच्या भावजीला संपवण्याचा कट रचला असून त्यामुळे जीवाला धोका असल्याचं सांगत त्याची तक्रार काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे.

भाजपचे सुरेश पाटील आणि काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल या दोन्ही प्रकरणांकडे पहिले तर पक्षांतर्गत कुरघोड्या, सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी, त्यातूनच आपल्या मार्गातून काढण्यासाठी केलेले प्रयत्न यावरून सोलापुरातील राजकारण कोणत्या दिशेला जात आहे याचा अंदाजा  येईल. दोघांनी स्वतःच्याच पक्षातील लोकांवर केलेले आरोप किती खोटे, किती खरे हे तपासात समोर येईलच. मात्र या निमित्ताने राजकारण किती ‘डर्टी’ बनलंय हे समोर आलंय. राजकारणात आल्यावर पद, प्रतिष्ठा आणि सन्मान तर मिळतोच, शिवाय समाजकारणही होतं, असा समाज आहे. पण सोलापूरच्या डर्टी पॉलिटिक्सने सर्व समज मोडित काढले आहेत.