‘ते आमच्या दालनात आले म्हणून…’ शरद पवारांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची पहिली मोठी प्रतिक्रिया

Eknath Shinde Sharad Pawar Meeting : काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या, आता एकनाथ शिंदे यांनी या भेटीवर भाष्य केले आहे.

ते आमच्या दालनात आले म्हणून... शरद पवारांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
Eknath Shinde Sharad Pawar
Image Credit source: Google
| Updated on: Jul 09, 2026 | 5:33 PM

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यभरातील नेते सध्या मुंबईत आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक सोडून एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या भेटीवर अनेकांनी टीका केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत या भेटीमागील कारण सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

संजय राऊत शरद पवारांवर नाराज

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले होते. संजय राऊत यांनी म्हटले होते की, शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत. आदरणीय नेते आहेत. पण एखाद्या ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणे त्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासाहर्ता घसरते आणि ती कमी होते. शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यामुळे आमचं मन दुखावलं आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय. आता यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक आपला दवाखाना सुरू केलेत. तीथे त्यांनी जावे आणि उपचार करून घ्यावेत. अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. कारण सध्या शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याची चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष आहे. त्यामुळेही या भेटीला खास महत्त्व प्राप्त झाले आहे.

Follow Us