Eknath Shinde | इकडे आड तिकडे विहीर, भाजपशी युती नाही, शिवसेनेत जायचं नाही, शिंदे गटाचा झेंडा कोणता? तिसरा मुद्दा महत्त्वाचा!

| Updated on: Jul 14, 2022 | 12:22 PM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र रित्या निवडणूक लढवण्यासाठी मनाची तयारी केली आहे. आमदारांचा तसा शिंदेंवर दबाव वाढू लागलाय.

Eknath Shinde | इकडे आड तिकडे विहीर, भाजपशी युती नाही, शिवसेनेत जायचं नाही, शिंदे गटाचा झेंडा कोणता? तिसरा मुद्दा महत्त्वाचा!
Follow us on

मुंबईः भाजपने अदृश्य हात पुढे केल्यानं शिवसेनेतून फुटून बाहेर पडण्याचं धाडस एकनाथ शिंदे गटानं दाखवलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) फुटली. शिवसेना छिन्नविछिन्न झाली. राज्यात भाजप-शिंदे (BJP-Shinde) गटाचं सरकार आलं. मुख्यमंत्री कामाला लागले. पण दुखावलेली शिवसेना (Shivsena) आणि सत्ता वाढवण्याच्या इरेला पेटलेला भाजप या दोघांमध्ये शिंदे गटाची दमछाक होतेय, हे खरं. विद्यमान विधानसभेत मुख्यमंत्री पद, लाभाची पदं आमदारांना मिळणार असली तरी आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं भवितव्य काय? दोन महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. नेत्यांमागे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात आलेत. आता स्थानिक पातळीवर निवडणुकांसाठी कामाला लागावं लागणार. पण शिंदे गट नेमका कोणता झेंडा हाती घेणार, हेच अद्याप ठरलेलं नाही. टीव्ही 9 च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात असा दबाव आमदारांकडून एकनाथ शिंदेंवर टाकण्यात येत आहे. निर्णय काहीही असो, पुढील 3 मुद्द्यांवर शिंदे गटाचं भवितव्य ठरणार हे नक्की.

1. भाजपशी युती ?

भाजपने दिलेल्या भक्कम पाठिंब्यावर बंड तर केलं. पण 50-50 खोकी मिळाल्यानं आमदार फुटलेत, असा धडधडीत आरोप शिंदे गटावर केला जातोय. शिवसेनेतून बाहेर पडण्यामागे भाजपची फूस होती, हे तर जगजाहीर आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतला तर जनतेत वेगळा संदेश जाईल. संपूर्ण राजकीय कारकीर्दीत हा धब्बा माथ्यावर मिरवणं कट्टर शिवसैनिक असलेल्या शिंदे गटातील आमदारांना नको आहे. त्यामुळे भाजपात जात, त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढवण्यास आमदारांची तयारी नाही. किंवा हा निर्णय घेण्याची शक्यता फार कमी वर्तवली जात आहे.

2.शिवसेनेत माघार?

आम्हीच शिवसेना आहोत असं शिंदे गट म्हणत असला तरीही धनुष्यबाण या चिन्हावर अद्याप शिंदे गटानं दावा सांगितला नाहीय. याउलट उद्धव ठाकरेंच्या मनधरणीचं काम सुरु आहे. दीपक केसरकरांनी मागील दोन दिवसात केलेल्या वक्तव्यांवरून तरी शिवसेनेनं भाजपशी युती करावी, अशी तीव्र इच्छा शिंदे गटाची अजूनही आहे. उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द ऐकून घेण्याचीही शिंदे गटाची तयारी नाही. पण गेलेल्यांना न जुमानता शिवसेना पुन्हा एकदा कामाला लागली आहे. तळा-गाळातील कार्यकर्त्यांना आता मातोश्रीचे दरवाजे मोकळे होऊ लागलेत. संजय राऊतांचे विखारी शब्द कमी झाले असले तरीही आमदारांवरील टीका कमी झालेली नाही. त्यामुळे आता शिवसेनेत माघारी जाण्याचे दरवाजेही बंद झाल्यात जमा आहेत. त्यामुळे शिंदे गट शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे.

3. अपक्ष लक्षणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र रित्या निवडणूक लढवण्यासाठी मनाची तयारी केली आहे. आमदारांचा तसा शिंदेंवर दबाव वाढू लागलाय. भाजपची युती नाही आणि शिवसेनेत परत जायचं नाही. त्यामुळे शिंदे गटाला आता निवडणुकीत स्वतंत्र उभे राहून आपली ताकद दाखवून द्यावी लागणार. हा पर्याय शिंदे गटाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत प्रभावी ठरू शकतो. याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे- शिंदे गटानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर भाजपच्या पाठिंब्यावर बंड केल्याचा शिक्का पुसला जाईल. तसंच संजय राऊत आणि इतर नेते, जे वारंवार धनुष्यबाणाशिवाय निवडणुकीत उतरून दाखवा, अशा धमक्या देतायत. त्यांचीही तोंडं बंद होतील. दुसरं कारण म्हणजे- शिंदे गट स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरं गेला तर जनतेसमोर एकदाचं स्पष्ट चित्र उभं राहिल. सामान्यांचे, कष्टकऱ्यांचे नेते म्हणून शिंदे गटाची जी प्रतिमा आहे, ती आणखी उजळून निघण्याची शक्यता या पर्यायातून दिसेल. स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यानंत अपयश आलं तरीही आपलं नेमकं स्थान काय आहे हे शिंदे गटाला कळेल आणि जनतेचा संभ्रमही दूर होईल.