प्रकाश आंबेडकरांची भेट, माजी राष्ट्रपतींचा सुपुत्र वंचित आघाडीत?

| Updated on: Jul 16, 2019 | 5:30 PM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भेटीगाठींना ऊत आलं आहे. माजी राष्ट्रपतींच्या सुपुत्राने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली

प्रकाश आंबेडकरांची भेट, माजी राष्ट्रपतींचा सुपुत्र वंचित आघाडीत?
Follow us on

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भेटीगाठींना ऊत आलं आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत हे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण रावसाहेब शेखावत यांनी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.  काल ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

रावसाहेब शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे माजी आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब शेखावत यांना वंचितकडून अमरावतीची उमेदवारी मिळण्याची चिन्हं आहेत. अमरावतीतून सध्या भाजपचे सुनील देशमुख आमदार आहेत. त्यांच्याविरोधात रावसाहेब शेखावत यांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हं आहेत.

जर रावसाहेब शेखावत यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला, तर अमरावतीत त्यांची ताकद आणखी वाढेल. परिणामी भाजपसमोर तगडं आव्हान निर्माण होईल. मात्र रावसाहेब शेखावत यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट कोणत्या कारणासाठी घेतली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे त्यांचा वंचित प्रवेश आणि विधानसभेची तयारी याबाबत आताच काही सांगता येणार नाही.

कोण आहेत रावसाहेब शेखावत?

  • रावसाहेब शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव आहेत
  • रावसाहेब शेखावत यांनी 2009 मध्ये काँग्रेसकडून अमरवाती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
  • रावसाहेब हे 2009 ते 2014 या दरम्यान आमदार होते. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केला होता
  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा रावसाहेब आणि भाजप उमेदवार सुनील देशमुख यांच्यात लढत झाली. त्यावेळी रावसाहेब यांचा पराभव झाला

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला इशारा

दरम्यान, विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला केवळ 40 जागा देण्याचं मान्य केलं आहे. काँग्रेसला जर वंचितचा प्रस्ताव मान्य असेल तर त्यांच्यासोबत आघाडी होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आता विधानसभेला कोण-कोणासोबत जाणार, कुणाकुणाची आघाडी होणार हे येत्या काळात पाहावं लागेल.

संबंधित बातम्या 

….तरच काँग्रेससोबत जाणार : प्रकाश आंबेडकर