गुजरात विधानसभेचा निकाल काय लागणार? संजय राऊत म्हणाले…. ही लोकांची भावना!

| Updated on: Dec 05, 2022 | 11:57 AM

लोक मशीन्सबाबत संशय व्यक्त करत आहेत. पण माझ्या मते, लोकशाही अजूनही टिकून आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

गुजरात विधानसभेचा निकाल काय लागणार? संजय राऊत म्हणाले.... ही लोकांची भावना!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः पंतप्रधान पदावर असूनही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुजरातसाठी खूप वेळ दिला आहे. निवडणुकांसाठी (Gujrat Assembly Election) मोठी बाजी लावली आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ‘मशीन गडबड करू शकतात, निवडणुकांचे निकाल त्यांच्याच बाजूने लागू शकतात’, अशी लोकांची भावना आहे, असं मोठं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होईल की नाही, हे मी आताच सांगत नाही, लोक मशीन्सबाबत संशय व्यक्त करत आहेत. पण माझ्या मते, लोकशाही अजूनही टिकून आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते हार्दीक पटेल यांनी आज मतदान केलं. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या तीन महत्त्वाच्या पक्षांमध्ये गुजरातमधील लढत होतेय. दिल्ली, पंजाबनंतर थेट नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये आपने मोठा जोर लावलाय. त्यामुळे यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलंय. येत्या 8 डिसेंबर रोजी गुजरातेत मतमोजणी पार पडणार आहे.

या निवडणुकीत कुणाचा विजय होईल, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
बराच वेळ गुजरातला दिलाय. प्रधानमंत्री हे गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री म्हणूनही त्यांनी बराच कालखंड गुजरातमध्ये घालवला आहे.

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची ही दुसरी टर्म आहे. तरीही गुजरात विधानसभा निवडण्यासाठी पंतप्रधानांना फार मोठी बाजी लावायला लागली, भाजपाचं तिथं किती स्थान आहे, हे स्पष्ट होतं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय

खरं तर भाजपने कोणत्याही प्रचाराशिवाय ही निवडणूक जिंकायला पाहिजे होती. पण प्रधानमंत्री, गृहमंत्री, पक्षाचे अध्यक्ष, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हे सगळेच पणाला लावले आणि गुजरातमध्ये प्रचार केला. तरीही निकाल काय लागतील, हे मी सांगू शकत नाही.. असं वक्तव्य संजय राऊत म्हणाले.

लोकं म्हणतात की, आमचा निवडणूक यंत्रणेवर विश्वास नाही..सरकारच्या विरुद्ध भावना असतील तरी तेच जिंकतील. मशीन गडबड करुन तरी तेच जिंकणार आहेत, असं लोक म्हणतायत. पण माझ्यामते लोकशाही आहे. मशीन गडबड करून करून तरी किती करणार, असं राऊत म्हणाले.