नरेंद्र मोदींचा काल फोन आला अन् रात्री उशिरा समजलं…; हरिभाऊ बागडे यांनी सांगितला राज्यपाल होण्याचा किस्सा

"आता मला जी जबाबदारी मिळाली आहे, ते काम माझ्या हातून चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे", असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.

नरेंद्र मोदींचा काल फोन आला अन् रात्री उशिरा समजलं...; हरिभाऊ बागडे यांनी सांगितला राज्यपाल होण्याचा किस्सा
| Updated on: Jul 28, 2024 | 2:43 PM

Haribhau Bagade On Rajasthan governor : भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आले. यात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नियुक्त केलेल्या राज्यपालांची नावे जाहीर करण्यात आली. यात ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. आता हरिभाऊ बागडे यांनी राज्यपाल होण्याचा एक किस्सा सांगितला आहे.

“तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं”

हरिभाऊ बागडे यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याचा किस्सा सांगितला. “मला काल सकाळी पावणे नऊच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. त्यांनी फोनवर मला काय चाललंय, अशी विचारपूस केली. मी ही त्यांना चांगलं चाललंय असं सांगितलं. यानंतर त्यांनी मला तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं. मी तुम्हाला सांगेन. पण तुम्ही हे कोणाला सांगू नका. मी इतरांना सांगेन”, असे हरिभाऊ बागडेंनी म्हटले.

“माझ्या हातून चांगलं काम व्हावं हीच अपेक्षा”

“मी काल बाहेर गेलो होतो. तिथून रात्री उशीरा आलो. त्यानंतर रात्री उशिरा बातमी आली. काहींनी मला फोन केला. पण मी झोपलो होतो. त्यामुळे मी फोन घेऊ शकलो नाही. मला रामूकाका शेळके आणि मंदार यांनी अडीच वाजता घरी आले आणि त्यांनी मला उठवून सांगितलं. मला त्याची पूसटशी कल्पना होती. आता मला जी जबाबदारी मिळाली आहे, ते काम माझ्या हातून चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे”, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.

“मी वयाच्या 12 व्या वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले आहे. संघदृष्ट्या सर्व शिक्षित आहे. भाजपचेही काम केले. 1985 साली मला अचानक निरोप आला आणि मी निवडणुकीला उभा राहिलो, निवडूनही आलो. पक्षासोबत काम केलं. जिथं कुणी नाही तिथे काम करण्याचं धोरण केलं त्यामुळे मला हे फळ मिळालं”, असे हरिभाऊ बागडेंनी म्हटले. त्यापुढे त्यांनी फुलंब्रीत कुणाला निवडायचं याचा निर्णय पक्ष घेईल, असेही सांगितले.